चौकशी सुरु असतानाच “सारथी’वरील तक्रार “क्‍लोज’

गेल्या 16 वर्षांचे परीक्षा शुल्क रखडले : अधिकाऱ्यांची दिरंगाई

पिंपरी – राज्य सरकारच्या निर्देशानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणारे परीक्षा शुल्क गेल्या 16 वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना दिलेले नाही. याप्रकरणाची पालिका स्तरावर चौकशी सुरु आहे. मात्र तक्रार सुरू असतानाच “सारथी’वरील तक्रारीचा नामोनिशान संबंधित अधिकाऱ्यांनी मिटविला आहे, याविषयी चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सम्यक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संतोष जोगदंड यांनी केली आहे.

महापालिकेने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची चौकशी सुरु असल्याचे दि. 22 ऑगस्टला लेखी पत्राद्वारे कळविले. मात्र लगेच दुसऱ्या दिवशी 23 ऑगस्टला याबाबतची “सारथी’वरील तक्रार “क्‍लोज’ केल्याचा संदेश जोगदंड यांना पाठविला आहे. तपास सुरु असतानाच तक्रार “क्‍लोज’ कशी केली, असा सवाल जोगदंड यांनी केला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात संतोष जोगदंड यांनी म्हटले आहे की, मागासवर्गीय परीक्षा शुल्क देखील मला मिळालेले नाही. राज्य सरकारच्या निर्देशानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माघारी देण्यात येते. याबाबत 8 ऑगस्ट 2017 रोजी पालिकेच्या “सारथी’या “हेल्पलाईन’वर तक्रार केली होती. ज्या शाळांनी परीक्षा शुल्क दिले नाही, त्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिली. त्यानंतर आयुक्तांनी शिक्षणाधिकारी बी. एस.आवारी यांना याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शिक्षण अधिकारी आवारी यांनी त्या शाळांना विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काबाबत माहिती मागविण्यासाठी पत्र दिले. विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काबाबत मात्र शाळांकडे माहिती नसल्याचे समजले आहे. त्यामुळे याप्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करणे गरजेचे असताना पालिकेने मात्र मुख्याध्यापक, लिपीक यांच्याकडून खुलासे मागविले आहेत. परीक्षा शुल्काची माहिती नसल्याने संबंधितांवर कारवाई गरजेची आहे, असे संतोष जोगदंड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)