चौकशी अहवाल त्वरित देण्याचे आदेश

नगर, (प्रतिनिधी)- नगर तालुक्‍यातील निंबोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीचा स्लॅब पडून झालेल्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, तातडीने चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहेत. त्याबरोबर पडलेल्या स्लॅबच्या बांधकाम साहित्यांची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे व मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

निंबोडी गावात 1998 मध्ये या शाळा खोलीला मंजुरी मिळाली. 2001 मध्ये खोलीचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु, मध्यंतरीच्या काळात पटसंख्या कमी झाल्याने या खोलीचा वापर हा शालेय पोषण आहाराचे अन्नधान्य ठेवण्यासाठी केला जात होता. परंतु, येथील शिक्षक व ग्रामस्थांनी शाळेत पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करून 75 पटसंख्येवरून मुलांची संख्या 350 च्या घरात नेली. त्यामुळे वर्गखोल्या कमी पडू लागल्याने गेल्या 15 दिवसांपूर्वी अन्नधान्यासाठी वापरात येणारी ही खोली अध्यापनासाठी वापरात आली होती. इयत्ता 5 साठी ही खोली देण्यात आली होती. त्यामुळे तेथे वर्ग भरत होते. ही खोली चांगली होती. स्लॅब गळती नव्हती की भिंतींना तडेदेखील गेले नव्हते. त्यामुळे ही खोली अध्यापनासाठी वापरण्यात येत होती. परंतु, अचानक सोमवारी या खोलीचा स्लॅब पडला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. ज्यावेळी ही खोली बांधण्यात आली तेव्हा छाया पाटोळे या सरपंच होत्या.

जिल्ह्यात धोकादायक शाळा खोल्यांची माहिती वारंवार शिक्षण विभागाला मागण्यात आली. परंतु, ती त्या विभागाकडून उपलब्ध न झाल्याची माहिती खुद्द अध्यक्षा विखे यांनी यावेळी दिली. शिक्षण समितीमध्येदेखील ही माहिती देण्याचे सांगण्यात आले. पण, त्यांनादेखील माहिती मिळालीच नाही. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनीदेखील या माहितीचा आग्रह धरला. परंतु, प्रशासनाला याबाबत माहिती देता आली नाही. केवळ दोन वर्षांपूर्वी 134 शाळा निर्लेखन करण्यात आल्या असून गेल्या वर्षी 70 शाळाखोल्यांचे निर्लेखन करण्यात आले आहे. यापूर्वी 300 खोल्यांचे निर्लेखन करण्यात आले. त्यापैकी 230 खोल्या पाडण्यात आल्या असून उर्वरित 70 खोल्या अद्यापही पाडण्यात आलेल्या नाहीत. निर्लेखन केलेल्या शाळा खोल्यांच्या यादीत या खोलीचा समावेश नव्हता.

सध्या तरी जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांची माहिती घेण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी व अभियंत्यांना देण्यात आली आहे. त्याबरोबर धोकादायक शाळा खोल्यांची माहिती तातडीने देण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत. असे सांगून अध्यक्षा विखे म्हणाल्या की, 434 नव्याने शाळा खोल्यांची जिल्ह्याला आवश्‍यकता असून त्यासाठी 35 कोटींचा निधी आवश्‍यक आहे. तो मिळावा यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जात आहे. निंबोडी घटनेत मरण पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला राजीव गांधी अपघात विमा योजनेतून प्रत्येकी 75 हजार, तर नैसगिक आपत्ती या विभागाकडून प्रत्येकी 4 लाख रुपये मदत केली जाणार आहे, असे अध्यक्षा विखे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव गाडे, संदेश कार्ले, काशिनाथ दाते, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे उपस्थित होते.

आता तरी शासनाला जाग येणार का?
जिल्ह्यातील शाळांना बाक मिळावे म्हणून साई संस्थानला निधीची मागणी केली होती. परंतु, बाकापेक्षाही शाळा खोल्यांसाठी निधी आवश्‍यक असल्याचे माहिती घेतल्यानंतर लक्षात आले. त्यानंतर साई संस्थानला शाळा खोल्यांसाठी 30 कोटी निधी देण्याची मागणी केली. त्याबाबत संस्थानच्या अध्यक्षांसह मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. परंतु, करतो.. देतो अशीच आश्‍वासने मिळाली. निदान आता तीन मुलांचा बळी गेल्यानंतर तरी शासनाला जाग येईल का? असा सवाल अध्यक्षा विखे यांनी यावेळी केला.

जिल्हा नियोजन समितीकडून शाळा खोल्यांच्या दुरुस्ती व नव्याने खोल्यांसाठी जिल्हा परिषदेला निधी उपलब्ध करूनदेखील तो अखर्चित असल्याचा आरोप आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केला होता. याबाबत प्रशासनाने अप्रत्यक्षरीत्या कबुलीच दिली. आजही 3 कोटी 73 लाख रुपये निधी अखर्चित आहे. दुरुस्तीसाठी 1 कोटी 66, तर शाळाखोल्यांसाठी 2 कोटी 77 लाख रुपये असा 3 कोटी 77 लाख निधी सन 2016-17 ला मिळाला असून, तो दोन वर्षे करण्याची मुदत असल्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

434 शाळा खोल्यांना निर्लेखन करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यापैकी 230 खोल्या पाडण्यात आल्या आहेत. मात्र, उर्वरित 214 खोल्यांचा वापर सोमवारपर्यंत सुरू असल्याचे उघडकीस आले असून, खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांनी या खोल्या न वापरण्याचे आदेश सोमवारी रात्री उशिरा सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले असून वर्ग मंदिर, ग्रामपंचायत हॉल किंवा मंगल कार्यालयात भरविण्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)