चौकट निखळल्याने मनसेचा परीक्षेचा काळ!

वातावरणनिर्मितीसाठी राज ठाकरे यांच्या सभेचे नियोजन


मुंबईत आज होणाऱ्या बैठकीकडे लक्ष 

– प्रदीप पेंढारे

नगर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्यावर्षी इच्छुकांच्या परीक्षा घेतल्या होत्या. यावर्षी त्यांनी हा जुमला बाजूला ठेवला आहे. मनसेने महापालिकेसाठी तयारी सुरू केली असली, तरी ही निवडणूक त्यांच्यासाठी कसोटीची ठरणार असेच चित्र आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर मनसेचे स्थानिक पदाधिकारी उद्या बुधवारी मुंबई येथे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन निवडणुकीच्या दृष्टिने प्राथमिक अहवाल ठेवणार आहे. या अहवालावर राज ठाकरे काय आदेश देतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या निवडणूक उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आजपासून प्रारंभ झाला आहे. राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग येऊ लागला आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन मात्र या धामधुमीत सावकाश पुढे सरकत आहे. गेल्या पंचवार्षिकेला मनसेने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. ही प्रक्रिया निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच क्षणी राबवली गेली होती. यावर्षी मात्र, मनसेने परीक्षांना बगल दिला आहे. पक्षाचा आदेश असल्याचे कारण पदाधिकारी सांगत आहे. परंतु गेल्या पंचवार्षिकला परीक्षा घेऊन मनसेने चांगले वातावरण निर्माण केले होते. परीक्षेनंतर तोंडी परीक्षा देखील घेतली होती. यावर्षी मात्र तसे काहीच दिसत नाही. गेल्या पंचवार्षिकला मनसेकडून 48 जणांनी उमेदवारी केली होती. सर्वात जास्त उमेदवार देणारा पक्ष मनसे ठरला होता. यातून गणेश भोसले, किशोर डागवाले, वीणा बोज्जा, सुवर्णा जाधव हे चौकटीने मनसेच्या माध्यमातून महापालिकेच्या सभागृहात प्रवेश अनुकूल केला होता. मात्र ही चौकट सत्तेत जास्त काळ टिकू शकली नाही. एक-एक करत ही चौकट आता निखळून पडली आहे.

किशोर डागवाले यांनी भाजपमध्ये, सुवर्णा जाधव यांनी शिवसेना, तर गणेश भोसले हे राष्ट्रवादीच्या मार्गावर आहेत. एकमेवर वीणा बोज्जा या आता मनसेबरोबर आहेत. बोज्जा यांनी देखील मनसेबरोबर राहण्याअगोदर अनेक ठिकाणी चाचपणी केल्याचे समजते. यावर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. बोज्जा आता मात्र यातून सावरत पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे मनसेला काहीशी उभारी आली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर मनसे आता सावरत आहे. वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात राहून गजेंद्र राशीनकर यांच्यावर शहराची जबाबदारी सोपावली आहे. गजेंद्र राशीनकर यांनी कार्यकर्त्यांशी जुळवाजुळव करत मनसे शहरात वाढवित आहे. मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, नितीन भुतारे असे युवा कार्यकर्ते त्यांच्या परिने पक्षवाढीचे काम करत आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी प्राथमिक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल उद्या बुधवारी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर होणार आहे. राज ठाकरे या अहवालावर काय आदेश देतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

अमित ठाकरे प्रचारात उतरणार
राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित हे नगरच्या महापालिका प्रचारात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहे. सुमित वर्मा यांनी मुंबई येथे जाऊन अमित यांची भेट घेत प्रचाराचे निमंत्रणही दिले होते. अमित ठाकरे यांच्याबरोबर मनसेचे नेते बाळा नांदगावकर, मनसेचे राज्य सचिव रिटा गुप्ता, मनविसेचे राज्य उपाध्यक्ष रुपाली पाटील, नेते संदीप देशपांडे, नाशिकचे नगरसेवक सलीम शेख हे प्रचारासाठी नगरमध्ये येणार आहेत.

राज ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. याच काळात महापालिका निवडणूक होत आहे. राज ठाकरे यांच्या सभेचे नियोजन करत आहोत. ही सभा कार्यकर्त्यांना उभारी देणारी व नगर शहराच्या विकासाला दिशा देणारी ठरू शकते. पक्षाच्या आदेशाप्रमाणे यावर्षी परीक्षा न घेता पुढील दोन दिवसात इच्छुकांच्या मुलाखती घेऊन उमेदवार निश्‍चित करणार आहोत.
– सचिन डफळ (जिल्हाध्यक्ष, मनसे)

मनसेबाबतची परिस्थिती…
– गेल्या पंचवार्षिकाला लेखी व तोंडी परीक्षा
– 48 जणांना उमेदवारी दिली होती
– चार नगरसेवक निवडून आले होते
– एकच नगरसेवक आता मनसेसोबत
– यावर्षी परीक्षेला बगल देत थेट मुलाखती
– आता 60 ते 70 जणांनी अर्ज नेलेत
– नेलेल्या अर्जापैकी 30 अर्ज जमा
– मनसेच्या सद्यस्थितीचा प्राथमिक अहवाल सादर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)