चैत्रगौर

आरती मोने

चैत्र महिना हा मराठी नववर्षाचा पहिला महिना. चैत्राची चाहूल लागली की हवेतला गरमपणा जाणवू लागतो. झाडे, निसर्ग देखील आपली पहिली वस्त्रे (पाने) उतरवून नवीन वस्त्रे परिधान करतात. चैत्र पालवी बहरू लागते. वैशाखाकडे सरकताना हवेतील उष्मा वाढत जातो. पण याच दिवसात येणाऱ्या आंबट कैऱ्यांनी, लाल बुंद कलिंगडांनी, बहरलेल्या गुलमोहरांनी आणि सोनझुंबर आणि बहावा नि मोगऱ्याच्या सुगंधाने कुठेतरी या लाही लाही करणाऱ्या उन्हाळ्यात मनाला आणि डोळ्यांना सुखद गारवा मिळतो.

चैत्र महिना देखील देवीचा महिना समजला जातो. अनेक छोट्या छोट्या गावातून देवींचे उत्सव या महिन्यात साजरे होतात. तशी घराघरातून देखील त्तिजेला देवीची स्थापना करतात. घरातीलच आपली अन्नपूर्ण देवी पितळेच्या सुबक पाळण्यात ठेवून तिला सुगंधी मोगऱ्यांची फुले वाहतात. देवी पाळण्यात ठेवण्याची प्रथा देखील उकाड्यामुळेच पडली असेल असे वाटते. झोपाळ्यात बसून मंद झुळके बरोबर देवी कदाचित सुखावत असेल आणि म्हणूनच मग अक्षय्य तृतियेपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात एक दिवस खास चैत्र गौरीच्या हळदीकुंकवाचा.

हळदी कुंकवाचे कार्यक्रम आपल्याकडे खास करून महिलांसाठीच असतात. ठेवणीतल्या साड्या आणि दागिने घालण्याची हौस यामुळे पुरविली जाते. शिवाय नातेवाईक, खास मैत्रिणीयांचीही भेट या निमित्ताने होते. शिवाय चैत्रगौर मांडताना आपल्या सजावटीच्या कौशल्याचाही वापर करता येतो.

पूर्वी मुलींना माहेरी सतत जाण्याची मुभा नव्हती. घरातील वडिलधाऱ्यांना विचारूनच जाण्याची पद्धत होती. त्यामुळे हळदी कुंकवाचे दिवशी घरच्या माहेरवाशिणीला सकाळीच जेवायला बोलावण्याची पद्धत पडली. त्यानिमित्ताने तिला माहेरपण मिळते. आईलाही तिचे कौतुक करता येते.

संध्याकाळी हळदी कुंकवासाठी बाहेरच्या खोलीत खास सजावट करतात. भिंतीवर एखादा जुना शालू किंवा पैठणी लावतात. समोर घरातीलच एखादे टेबल, कपाट ठेवून त्यावर फुलांची, पानांची सजावट करतात. देवीसमोर कलिंगड, टरबूज आकर्षकरित्या मांडतात. लाडू आणि करंजीचा नैवेद्य दाखवितात. उन्हाळा बाधू नये म्हणून केलेले खास पदार्थ म्हणजे छानशी कैरीची, डाळ, पन्हे, काकडी आणि हरबऱ्याची ओटी असा बेत असतो. मोगऱ्याचे गजरे, अत्तर लावून वातावरण सुगंधीत होते. चैत्रांगण काढून अंगण सजवतात.

शेवटी काय या सारचे प्रयोजन एकच असते. मनाला आनंद मिळणे, आपल्या घरी लोकांनी येऊन त्याचा यथोचित सन्मान करणे त्यांना खाऊ पिऊ घालणे या छोट्या छोट्या कार्यक्रमातही आनंद असतो तो मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर रोजचे यांत्रिक जीवन आपण जगतच असतो. थोडा विरंगुळाही हवाच.
आताच्या या जीवघेण्या धडपडीच्या काळात या प्रथा होत चालल्या आहेत. पण आताची मंडळी जी “गेड टु गेदर’ रि युनियन भिशी वगैरे करतात ना, त्याचाच हा एक भाग समजावा- चैत्रगौरीचे हळदीकुंगू.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)