चैत्यन्योत्सव आजपासून

वाजत-गाजत होणार गणपती बाप्पांचे आगमन

पुणे –

नमूं गणपती मंगळमूर्ती।
जयाचेनि मतिस्फूर्ती।
लोक भजनी स्तवन करिती।
आत्मयाचें।।
असे म्हणून ज्या गणेशाच्या आराधनेने शुभकार्याची सुरूवात होते त्याच्या स्वागतासाठी पुणे नगरी सज्ज झाली आहे. रस्त्यारस्त्यांवर उभारलेले मांडव, माणसांची गर्दी, सगळीकडे चैतन्य, आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात पुण्यातील सार्वजनिक मानाच्या गणपतींबरोबर घराघरांत आज (गुरूवारी) बाप्पांचे आगमन होणार आहे.

बाप्पांच्या आगमनासाठी पहाटेपासूनचाच मुहूर्त असल्याने सगळीकडे आदल्या दिवशीपासून स्वागतासाठीच लगबग सुरू झाली आहे. विद्येची-बुद्धीची देवता असणारी गणेश देवता घराघरांत सुख, शांती, समाधान घेऊन येणार असून अवघी पुण्यनगरी त्यासाठी सज्ज झाली आहे.

बाप्पांच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला सर्वत्र गर्दी पहायला मिळाली. सारसबाग, शनिवारवाडा, मंडई या महत्त्वाच्या ठिकाणी गणेशमूर्ती घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. तर हार, दुर्वा, आगाडा, शमी, फुलांनी, कमळपुष्प यांनी बाजारपेठ सजली आहे. पहाटेपासूनचाच मुहूर्त असल्याने अनेकांने आदल्यादिवशीच मूर्ती घरी घेऊन जाण्याची तयारी केली आहे. तसेच घराघरातील स्त्रिया, आबालवृद्ध गणपतीच्या आगमनासाठी गेल्या आठ दिवसांपासून तयारी करत आहेत.

या आनंद सोहळ्याच्या तयारीसाठी ढोल-ताशा पथकेही सज्ज झाली असून, त्यांच्या गजरातच अनेक गणेशमंडळे मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहेत. या अकरा दिवसाच्या सोहळ्यात अनेक सार्वजनिक मंडळांनी पौराणिक, धार्मिक तसेच सामाजिक संदेश देणारे देखावे तयार केले असून, ते पहायला येणाऱ्यांची संख्याही येत्या काळात मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळेच हा आनंद सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी महापालिका, पोलीस यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा, मंडळांचे कार्यकर्ते तसेच नागरिक गेल्या काही दिवसांपासून अहोरात्र काम करत आहेत.

 

दुपारी पावणेतीनपर्यंत मुहूर्त
गुरूवारी सूर्योदयापासून श्रींची प्रतिष्ठापना करण्यासाठीचा मुहूर्त असून दुपारी पावणेतीनच्या आत गणेशाची प्रतिष्ठापना करावी, अशी माहिती पंडित तेजस सप्तर्षी यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)