चुकून शहरात आलेल्या सांबराचा दुर्देवी मृत्यू

हडपसर – हडपसर परिसरात सांबर घुसल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. पुणे-सोलापूर आणि पुणे-सासवड मार्गाच्या दरम्यान असणाऱ्या एका कालव्यामध्ये हे सांबर पहाटे पाच वाजल्यापासून फिरत आल्याने नागरिकांनी पोलीस आणि कात्रज सर्पोद्यानाचे रेस्क्‍यू टीमला माहिती दिली.

सर्पोद्यानाच्या रेस्क्‍यू टीमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सांबराला पकडण्यासाठी डाट मारून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते बेशुद्ध न होता सैरावैरा धावत होते. शेवटी उद्यानामधील एका मार्गावर रेस्क्‍यू टीम व अग्निशमन दलाने लावलेल्या नायलॉनच्या जाळीमध्ये सांबर अडकले. या सांबराला उपचारासाठी कात्रज सर्पोद्यानात नेले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भरकटलेल्या सांबराला रेस्क्‍यू टीमने शर्थीचे प्रयत्न करून तब्बल दोन तासानंतर जेरबंद केले. मात्र, यावेळी सांबराला पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांच्या गोंधळामुळे आणि भटकी कुत्री मागे लागल्यामुळे सांबर कालव्या लगतच्या संरक्षक भिंतीला आणि उद्यानातील जाळीला जोरदार धडक देत होते. त्यामुळे सांबर जबर जखमी झाले होते. रेस्क्‍यू टीमचे महेश देशपांडे व त्यांच्या टीमने त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र ते अपयशी ठरले. भेदरले सांबर पकडल्यानंतर त्याच्या हृदयाचे ठोके प्रचंड वाढले होते. त्यामुळे या सांबराचा मृत्यू झालेला असावा, अशी शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)