चुकीला माफी नाहीच !

जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांची सडेतोड मुलाखत

प्रशांत जाधव

-Ads-

जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी साताऱ्याची सुत्रे हाती घेतल्यापासून बोलणे कमी अन काम जादा असा कार्यक्रम राबवला. त्यामुळे सामान्य माणसासह पोलिस दलालासुध्दा आपल्या या मितभाषी अधिकाऱ्याबद्दल उत्सुकता होती. पंकज देशमुख म्हणजे संयमी अधिकारी, पोलिस दलाच्या शिस्तीचे कोणत्याही परिस्थितीमध्ये पालन झालेच पाहीजे. काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर अन्याय होता कामा नये. तसेच पोलिस दलात काम करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्याने तोंडदेखली कारवाई करू नये. माझ्या पोलिस दलातील कोणत्याही कर्मचाऱ्याचे मनोबल मी  खचु देणार नाही. यासह अनेक मुद्‌द्‌यावर एसपी पंकज देशमुख यांच्याशी झालेल्या दिलखुलास गप्पा.

प्रभात: सातारा अन उस्मानाबाद यात काय फरक वाटला?

पंकज देशमुख : सातारा, उस्मानाबाद या दोन जिल्ह्यात भौगोलिक,नैसर्गीक,सामाजिक असे अनेक बदल आहेत. उस्मानाबादच्या तुलनेत सातारा लोकसंख्येने दुप्पट आहे. उस्मानाबादला फक्त आठ तालुके आहेत. तर साताऱ्याला अकरा तालुके आहेत. सातारा जिल्हा काम करण्यासाठी चॅलेंजींग आहे; असे मला वाटते.

प्रभात: तुम्ही अभियंता आहात, मग पोलिस दलात कसे काय आलात.

पंकज देशमुख: खरे तर स्पर्धा परीक्षा द्यायची अन त्यात यश मिळवायचे हे माझे ध्येय होते. त्यावेळी मी आयएएस,आयआरएस,आयपीएस असे पर्याय ठेवले होते. सुदैवाने महाराष्ट्रात काम करण्याची संधी मिळत असल्याने मी पोलिस दलात आलो.

प्रभात : सातारा पोलिस दलाबाबत काय वाटते?

पंकज देशमुख : सातारा पोलिस दल हे खुप चांगले आहे. अधिकारी कर्मचारी खुप शिस्तबध्द आहेत. त्यामुळे लोकांना सेवा देताना अडचणी येत नाहीत. महाराष्ट्रातील पहिल्या तीन स्मार्ट पोलिस दलात माझ्या सातारा पोलिसांचा क्रमांक लागतो. याचा मला अभिमान आहे. लवकरच आम्ही बैठका घेऊन जिल्ह्यातील किमान 150 पोलिस ठाणी स्मार्ट करू. तसेच सातारा जिल्ह्यात डिजीटल पोलिस ठाणी निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. कारण त्यामुळे लोकांचा वेळ वाया जाणार नाही.

प्रभात: तुमचे नक्की व्हिजन काय आहे ; हा लोकांसह पोलिस दलाला पडलेला प्रश्‍न आहे.

पंकज देशमुख : लोकांची कामे झाली पाहिजेत. त्यांना सेवा मिळायला हवी. महत्वाचे असे की, कायद्याचा अंमल राखताना तो चेहरा,जात , पात, गरीब , श्रीमंत तसेच राजकीय दबाव न घेता तो राखला पाहीजे. कायद्यापुढे सर्व समान असतात. या दृष्टीने काम करणे हेच माझे व्हिजन.

प्रभात: गणेश उत्सवात डॉल्बीचा नाही तर पोलिसांचा आवाज घुमला.दरम्यान काय रणनिती आखली होती.

पंकज देशमुख : न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायचे हीच रणनिती होती.

प्रभात: आगामी निवडणुका शातंतेत पार पाडण्यासाठी काय मोहिम आहे का?

पंकज देशमुख : निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबींची वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी केली आहे. मनुष्यबळाच्या दृष्टीने पोलिस ठाण्यांलडून माहिती मागवली आहे. तसेच निसडणूक काळात शांतता भंग करणाऱ्या प्रत्येकाचा कायद्याने बंदोबस्त केला जाईल. तडीपारीसारख्या कारवाया केल्या जातील. शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे काही करावे लागेल ते केले जाईल.

प्रभात : तुम्ही पोलिस अधिकाऱ्यांना शिस्तीचा पाठ दिला. काही तक्रारी होत्या का त्यांच्याबद्दल?

पंकज देशमुख : नाही,तक्रार असे काही नाही. पण बऱ्याचदा प्रमुखाला काय अपेक्षित आहे हे तळागाळापर्यंत पोहचायला हवे. अधिकरी कर्मचाऱ्यांनी बेशीस्त वागू नये यासाठी सूचना दिल्या.

प्रभात : तुम्ही खुप स्पष्टवक्ते आहात, त्याचा कधी त्रास होतो का?

पंकज देशमुख : समोरच्या माणसाला वस्तुस्थिती समजावली तर त्रास होण्याचा प्रश्‍नच येत नाही. त्यामुळे स्पष्ट बोललेलेच बरे.

प्रभात : अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी आहेत. त्यामुळे नव्या दमाच्या लोकांना कामाची संधी मिळत नाही. काय सांगाल?

पंकज देशमुख : याबाबत तुम्हाला आठ दिवसात बदललेले चित्र पाहयला मिळेल.

प्रभात : गोडोली पोलिस चौकीची दुरावस्था झाली आहे? विषारी नागामुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत असतो; त्यासाठी काही करणार आहात का?

पंकज देशमुख : गोडोली चौकीचे रुपडे नक्कीच बदलणार. आम्ही काही सामाजिक संघटनांशी चर्चा केली आहे. त्यांच्या मदतीने आम्ही लवकरच गोडोली चौकी,वाढे फाटा चौकी,कॅप्टन सतीश शिंदे चौक्‍या सुस्थितीत सुरू होतील. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक दूरक्षेत्र हे चोवीस तास कार्यरत राहील.

प्रभात : बहुतेक पोलिस ठाण्यात महिला कक्ष बंद आहेत. काय सांगाल ?

पंकज देशमुख : महिला कक्ष हे महिलांसाठी सुरू केले आहेत. त्यामुळे ते सुरू राहावेत यासाठी सूचना करू. काही ठिकाणी काही कक्ष तांत्रिक गोष्टीमुळे बंद असतील तर ते तात्काळ सुरू होतील.

प्रभात : अनेकदा कारवाई करताना पोलिस कर्मचाऱ्यांना राजकीय रोषाला सामोरे जावे लागते? अशावेळी तुमची भूमिका काय असेल?

पंकज देशमुख : तुम्ही पाहात असालच, मी कोणत्याही कर्मचाऱ्याला कारवाई करू नये म्हणून फोन करत नाही. अन्‌ कारवाई केली म्हणून कोणी कर्मचाऱ्यावर दबाव आणत असेल,तर मी कर्मचाऱ्यांच्या बाजुने असेन. कोणत्याही परिस्थतीत माझ्या कर्मचाऱ्याचे मनोबल खचू दिले जाणार नाही. चुकीला माफी नाही. मग तो कोणत्याही पक्षाचा,संघटनेचा कार्यकर्ता असो. कारवाई होणारच.

प्रभात : ओढून, ताणून मोक्‍क्‍याची कारवाई केल्याने ते तांत्रिकदृष्या टिकले नाहीत. त्यामुळे मोक्‍क्‍याची भिती कमी होण्याचा धोका संभवतो. काय सांगाल?

पंकज देशमुख : तुम्ही म्हणता तसे काही अपवाद केसेस मध्ये झाले आहे. पण बाकीचे तडीस जातील. कायद्याच्या कसोटीला टिकतील अशाच कारवाया करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. मग ती मोक्‍क्‍याची असो किंवा इतर.

प्रभात : नवरात्र उत्सवात बंदोबस्ताचे काय नियोजन आहे? तसेच काही दौडी निघतात या काळात त्यामध्ये तलवारींचा वापर होतो. त्यास मज्जाव केल्याचे माहिती आहे.

पंकज देशमुख : हो! तुमची माहिती खरी आहे. सातारा जिल्ह्यात निघालेल्या दौडीत एकही तलवार आयोजकांनी वापरली नाही. बंदोबस्ताचे म्हणाल तर तो नेहमीप्रमाणे आहेच. सामान्य नागरिकांना सुखाने व बिनधास्त फिरता यावे यासाठी आम्ही काम करत आहोत.

What is your reaction?
72 :thumbsup:
30 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)