बीजिंग: तुम्ही घरात आणि घराबाहेर छोटे मोठे असंख्य डास पाहिले असतील, पण चीनमध्ये सापडलेल्या या डासाएवढा डास तुम्ही नक्कीच पाहिला नसेल. चीनमधील सिचुआन प्रांतात कीटकतज्ज्ञांनी एका भल्यामोठ्या डासाचा शोध लावला आहे. या डासाच्या पंखांचा विस्तार सुमारे 11.15 सेंटीमीटर आहे. चीनमधील सरकारी प्रसारमाध्यम असलेल्या शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार हा डास गतवर्षी ऑगस्ट महिन्यात सापडला होता.
पश्चिम चीनमधील कीटक संग्रहालयाचे क्युरेटर चाओ ली यांनी सांगितले की, हा डास जगातील सर्वात मोठ्या डासांची प्रजात असलेल्या हालोरुसिया मिकादो वर्गातील आहे. डासांची ही जात सर्वप्रथम जपानमध्ये आढळली होती. संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार सर्वसामान्यपणे या प्रजातीमधील डासांच्या पंखांचा विस्तार हा 8 सेंटीमीटर पर्यंत असतो. पण हा नवा डास खूपच मोठा आहे.
दरम्यान, हे डास आकाराने मोठे दिसत असले तरी ते माणसांचे रक्त शोषत नाहीत. या प्रजातीमधील प्रौढ डासांचे आयुर्मान काही दिवसांचेच असते. तसेच त्यांचा मुख्य आहार फुलांमधील परागकण असतो. जगभरात डासांच्या हजारो प्रजाती आहेत मात्र त्यापैकी केवळ 100 प्रजातीच मनुष्यासाठी त्रासदायक आहेत,अशी माहितीही चाओ ली यांनी दिली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा