चीनमध्ये रहा चिनी लोकांसारखे!

गेल्या तीन महिन्यांपासून मी चीनमधील एका वैद्यकिय परिषदेला जायची तयारी करत होते. खाण्या-पिण्याचे पदार्थ, कपडे घेण्यापासून गूगल फ्री झोनमध्ये रहाण्याची मानसिक तयारीही सुरु होती! अनेकांनी मला चिनी लोकांपासून जरा लांबच रहायचा सल्ला दिला. चिनी लोक इतरांशी मैत्री करायला फारसे उत्सुक नसतात हे त्यामागचे कारण! काहींनी तर मला सुरक्षेच्या कारणास्तव चीनला न जाण्याचाच सल्ला दिला. आता लक्षात येतंय की मला सांगितल्या गेलेल्या गोष्टी पूर्णतः चूक किंवा बरोबरही नव्हत्या.

चीनमध्ये तग धरणे जरा अवघडच गेले. विशेषतः मी शाकाहारी असल्यामुळे असावे. चीनचा व्हिसा मात्र अगदी सहजगत्या मिळाला. मला व्हिसा ऑफिसमध्ये जास्तीच्या खेपा घालाव्या लागल्या नाहीत. तिथले अधिकारी देखील चांगले होते. पहिली अडचण मला सिंगापूर ते बिजींग विमानप्रवासात जाणवली. तेथे शाकाहारी अन्न म्हणून उकडलेले वांगे, परतलेली मश्रूम्स, टोफू आणि ब्रेड-बटर देण्यात आले!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बिजींगमध्ये इमिग्रेशनची प्रक्रियाही तात्काळ आणि विनासायास झाली. जरी बऱ्याचशा सूचना चायनिज भाषेत लिहिलेल्या असल्या तरी महत्वाच्या सूचनांचे इंग्रजीत भाषांतर केलेले असल्यामुळे फारसा त्रास झाला नाही. इथे आल्यानंतर सर्वच परदेशी प्रवाशांच्या बायोमेट्रिक नोंदी (बोटांचे ठसे इ.) घेतल्या जातात. आमच्या वैद्यकिय परिषदेच्या लोकांनी दिलेल्या सूचनांनुसार आम्ही इंग्रजी आणि चायनिज मध्ये लिहिलेला हॉटेलचा पत्ता जवळ ठेवलाच होता. त्यामुळे लगेचच कॅब मिळाली.

आमच्या सुदैवाने ज्या हॉटेलमध्ये आम्ही उतरलो होतो, तिथे इंग्रजी समजणारा एक माणूस होता. त्याने आम्हाला आम्ही जिथे जाऊ तिथे पिण्याचे पाणी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. चिनी लोक कायम गरम पाणी पितात त्यामुळे त्याने हा सल्ला दिला असावा. जेव्हा आम्ही वेगवेगळी ठिकाणे पहायला (साईट-सिइंगला) जायचो, तेव्हा आम्हाला प्रचंड चालायला लागायचे. कारण आजूबाजूचे लोक, कॅब ड्रायव्हर्स, दुकानदार यांना कोणालाच काहीच इंग्रजी कळायचे नाही. अगदी तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणांची नावेही इंग्रजी व चायनिजमध्ये वेगवेगळ्या प्रकारे उच्चारली जातात! पण भाषा सोडली तर इथले रस्ते, भुयारी मार्ग आणि एकूणच वाहतूक व्यवस्था अतिशय कार्यक्षम आहे. जरी आम्ही आमचा बहुतांश वेळ इथल्या व्यवसायिक भागात काढला, तरी भाषा आणि शाकाहारी अन्न यात आम्हाला अडथळे आले. शेवटी चीनची जगप्रसिद्ध भिंत, मिंगची कबर आणि जेड फॅक्‍टरी पहायला मात्र आम्ही इंग्रजी बोलणारा गाईड असलेल्या ग्रुप टूरचा मार्ग निवडला!

चीनची भिंत हा चिनी राज्यकर्त्यांच्या निष्ठा आणि समर्पणाचा अत्युत्कृष्ट नमुना आहे. Mrvianyu fabe हा भाग तर शारिरीक क्षमतेचा कस पहाणारा! अाम्हाला पूर्वीच सांगितल्याप्रमाणे रस्त्यात कुठेही खाण्या-पिण्याची व्यवस्था नव्हती. जेड फॅक्‍टरी पहाणे हा मात्र खूपच छान अनुभव होता. कलात्मकतेचा उत्तम आविष्कारच म्हणता येईल! हे एकच ठिकाण असे होते ज्या ठिकाणचे कर्मचारी आमच्याशी इंग्रजीमध्ये व्यवस्थित बोलू शकले. होली टेम्पल ऑफ हेवन इथे मला एक अतिशय मृदूभाषी बाई भेटली. तिने मला ताई-ची या मार्शल आर्टसचे काही प्रकारदेखील शिकवले!

माझ्या असे लक्षात आले की चीनमध्ये येणाऱ्या बऱ्याच अडचणी आपण पुरेशी पूर्वतयारी करून, खाण्या-पिण्याची व्यवस्था करून आणि भाषांतराचे अॅप्लिकेशन जवळ बाळगून सोडवू शकतो. चीनमध्ये फायरवॉलचा अडथळा येणार नाही असे काही अॅप्लिकेशन्स वापरता येतात. चीनमध्ये त्यांचे स्वतःचे युट्यूब, गुगल आणि फेसबुक देखील आहे.

मला असेही समजले की चीनमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव स्वतःचा पासपोर्ट कायम जवळ ठेवायला हवा आणि जोपर्यंत आपण त्यांचे नियम मोडत नाहीत तोपर्यंत आपण इतर कुठेही असू तितकेच चीनमध्येही अगदी सुरक्षित आहोत. आपण त्यांच्या वारसा आणि संस्कृतीत रस दाखवत असू, तर चिनी लोक खूष होतात पण परदेशी व्यक्तींशी ते फार संभाषण करत नाहीत.
काही अडचणी सोडल्या तर बिजींग हे अतिशय सुंदर आणि अगदी स्वच्छ ठिकाण आहे. तिथे सगळ्या सोयी सुविधा तर आहेतच आणि त्यांचा वारसा त्यांनी अगदी उत्कृष्टपणे जतन केला आहे.

– मानसी पाटील 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)