चीनबाबत सर्वांनी सुसंगत साथ द्यावी

शरद पवार यांचे मत : केंद्र सरकारच्या धोरणाबाबत पाठिंबा

पुणे – चीनची भारताबाबत भूमिका ही राष्ट्रीय समस्या आहे. त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याबाबत केंद्र सरकारने एखादी भूमिका घेतल्यास सर्वांनी त्याला सुसंगत अशी साथ दिली पाहिजे, असे सांगत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या चीनच्या भूमिकेबाबत पाठिंबा दर्शविला.

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या शताब्दी महोत्सवाच्या शुभारंभानिमित्त आयोजित समारंभात पवार यांचा त्यांच्या कार्यानिमित्त सत्कार ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी पवार बोलत होते. पालकमंत्री गिरिश बापट, महापौर मुक्ता टिळक, सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सोयासटीचे सचिव शशिकांत सुतार, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सोसायटीचे उपाध्यक्ष माणिकराव सातव पाटील, सहसचिव राजेंद्र जगताप, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळाचे अध्यक्ष ऍड. भगवानराव साळुंखे, कारभारी मंडळाचे अध्यक्ष साहेबराव जाधव उपस्थित होते.
पवार म्हणाले, मी संरक्षण मंत्री असताना दोन्ही देशांच्या सीमेवर अशाच प्रकारचा तणाव होता. त्यावर तोडगा म्हणून दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांनी सात दिवस बैठक घेऊन सीमेवरील सैन्य मागे घेण्याचा निर्णय झाला. मात्र, त्याचवेळी मला चीनच्या पंतप्रधानांना चीनमध्ये भेटण्याची संधी मिळाली. या भेटीत त्यांनी चीनचे लक्ष केवळ जगात आर्थिक महासत्ता होण्याकडे असल्याने इतर देशांकडे आम्ही लक्ष देत नाही. चीन महासत्ता झाल्यानंतर आजूबाजूच्या देशांवर लक्ष केंद्रीत करण्याचे त्यांनी सांगितले होते.
आता 25 वर्षांनंतर चीन आर्थिक महासत्ता झाला असून, चीनने भारतावर लक्ष केंद्रीत करायला सुरूवात केली आहे. ही आपल्या देशापुढे राष्ट्रीय समस्या आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत एखादी भूमिका घेतल्यास आपण आपल्यातील वाद सोडून सरकारच्या निर्णयाला साथ दिली पाहिजे. साथ देण्याची भूमिका घ्यायला मी तयार आहे, असेही त्यांनी केले.

लोकसंख्या वाढल्याने शेतीवरील भार वाढत असून विकास कामांमुळे शेतजमीन कमी होते आहे. अशातच एखादा नैसर्गिक फटका शेतकऱ्यांना बसल्यास त्यांना नैराश्‍य येते. हे नैराश्‍य सहन करण्याची शक्ती नसल्याने ते आत्महत्या करीत आहेत, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. भाई वैद्य म्हणाले, महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सर्वात उत्तम प्रशासक शरद पवारच आहे, हे ठामपणे सांगत आहे. चव्हाण यांच्यानंतर तोलामोलाचा नेता शरद पावारच आहे. त्यांनी आता सर्व विरोधकांना एकत्रित करून त्यांचे नेतृत्व करावे, ही आमची सर्वांची इच्छा आहे.

शिक्षण संस्था चालविणाऱ्यांनी शिक्षणमहर्षी व्हावे; मात्र शिक्षण सम्राट होऊ नये. शरद पवारांचे कार्य उत्तुंग आहे. राजकारणात पन्नास वर्षे सतत अविरतपणे प्रभावी काम करणे, ही मोठी गोष्ट आहे. शरद पवारांची स्तुती करा अथवा त्यांच्यावर टीका करा, ते स्थिर असतात. विजय झाला अथवा पराजय झाला तरी पवार शांत असतात. त्यामुळेच ते लोकनेते आहेत. सत्तेत असताना पवारांचे जेवढे राजकीय अस्तित्व होते, तेवढेच अस्तित्व सत्तेत नसताना देखील आहे. शरद पवारांनी गेल्या पन्नास वर्षांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये भरीव विकासकार्य काम केल्याने महाराष्ट्र त्यांच्या कार्यापुढे नतमस्तक आहे, असे पालकमंत्री बापट यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)