चीनच्या सीमेलगत तैनात जवानांच्या संख्येत भारताकडून वाढ

डोकलाम पेचाच्या पार्श्‍वभूमीवर महत्वाचे पाऊल

नवी दिल्ली -डोकलाम पेचाच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या सीमेलगत तैनात असणाऱ्या जवानांच्या संख्येत वाढ करण्याचे महत्वाचे पाऊल भारताने उचलले आहे. जवानांना अधिक सतर्कता बाळगण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

डोकलाम या त्रिकोणी भागात सुमारे आठ आठवड्यांपासून भारत आणि चीनचे सैन्य आमने-सामने आल्यावरून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यावरून भारताला इशारे देण्याचे सत्र चीनने आरंभले आहे. यापार्श्‍वभूमीवर, चीनच्या सीमेलगत असणाऱ्या सिक्कीम आणि अरूणाचल प्रदेशमधील भागांत तैनात असणाऱ्या भारतीय जवानांची संख्या वाढवण्यात आली.

स्थितीचा तपशीलवार आढावा घेऊन हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती तिचे संवेदनशील स्वरूप ध्यानात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर पीटीआय वृत्तसंस्थेला दिली. चीनच्या सीमेलगत तैनात करण्यात आलेल्या जवानांच्या संख्येतील वाढीचे प्रमाण सांगण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी नकार दर्शवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)