चिल्लर कमी करण्यासाठी पीएमपीचे प्रयत्न

डेपोस्तरावर नोटांबदल्यात सुट्ट्या पैशांचे वाटप : पन्नास हजाराने घटली रक्कम

– गणेश राख

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – पीएमपीच्या दैनंदिन तिकीट विक्रीतून जमा होणारी चिल्लर रक्कम स्वीकारण्यास सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने नकार दिला आहे. यामुळे गेल्या वीस दिवसांपासून पीएमपीच्या डेपोंमध्ये जवळपास 17 ते 18 लाख रुपयांची चिल्लर जमा झाली आहे. यावर अद्याप तोडगा निघत नसल्याने पीएमपीने चिल्लर कमी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

डेपोस्तरावरून डेपोस्तरावर रक्कम बदली करून देण्यात येत असून यामुळे दिवसाला जमा होणारी रक्कम पन्नास हजाराने घटल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे चिल्लर पैशांवर तोडगा निघेपर्यंत पीएमपीकडून हा प्रयत्न केला जाणार आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीकडे दैनंदिन जवळपास दीड ते दोन लाख रुपयांची चिल्लर रोज जमा होते. ही रक्कम पुणे कॅम्प येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखेत जमा केली जाते. मात्र, बॅंकेने दि.4 ऑक्‍टोबरपासून ही चिल्लर स्वीकारण्यास नकार दिला आहे. रिझर्व्ह बॅंकेचा दाखला देत विशिष्ट मर्यादेपर्यंतच रक्कम स्वीकारली जाणार असल्याचे बॅंकेकडून सांगण्यात आले आहे. यामुळे पीएमपी प्रशासनासमोर चिल्लर पैशांचे संकट उभे टाकले असून ते कमी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. प्रशासनाकडून थेट रिझर्व्ह बॅंकेशी पत्रव्यवहार करण्यात आला असला तरी अद्याप तोडगा निघू शकला नाही. यासाठी पीएमपीकडून डेपो स्तरावर सुट्ट्या पैशांची गरज असलेल्यांना नोटांच्या बदल्यात सुट्टे पैसे देण्यात येत आहेत. यामुळे जमा होणाऱ्या चिल्लर रक्कमेत फरक पडला असून दैनंदिन दीड लाखांच्या सुमारास जमा होणारी चिल्लर एक लाखापर्यंत खाली आली आहे. अशा प्रकारे हालचाली सुरू करून चिल्लर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बॅंकेचा सकारात्मक प्रतिसाद
गेल्या वीस दिवसांपासून बॅंकेने रक्कम स्विकारणे बंद केले आहे. यावर पीएमपी प्रशासनाकडून बॅंक अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्यासासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावर बॅंकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मात्र, जमा होणारी चिल्लरचे प्रमाण जास्त असून ती साठवण्यासाठी बॅकेलाही मर्यादा येत आहेत. यासंदर्भात पीएमपी प्रशासनाकडून रिझर्व्ह बॅंकेशी संपर्क साधण्यात आला असून यावर लवकर तोडगा निघणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)