चिमुकल्यांच्या तबला वादनाने रसिक मंत्रमुग्ध

– राधानंद संगीत विद्यालयातर्फे गुरुपुजन सोहळा

सांगवी – सांगवी येथील शकुंतला नारायण ढोरे स्मृती प्रतिष्ठाण व राधानंद संगीत विद्यालय आयोजित गुरुपूजन सोहळा नुकताच पार पडला. त्यात नंदकिशोर ढोरे संचालित राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध तालांमध्ये सुश्राव्य असे सामूहिक तबलावादन करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

औंध येथील पं. भीमसेन जोशी कलामंदिर येथे हा सोहळा पार पडला. त्र्यंबकेश्‍वर येथील अखिल भारतीय षड्‌दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, जेष्ठ तबलावादक पं सुनील देशपांडे, कलाश्रीचे अध्यक्ष पं. सुधाकर चव्हाण, पं धनंजय वसवे, नगरसेविका माई ढोरे, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भगवान वाल्हेकर, माजी नगरसेवक अशोक सोनवणे, कार्यक्रमाचे आयोजक नंदकिशोर ढोरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पं सुधाकर चव्हाण यांच्या बहारदार गायनाने झाली. त्यांनी राग मारू बिहाग मध्ये “रसिया आओ ना जाओ’ व “कैसे कैसे जाऊ मथुरा नगरी’ या बंदिशींचे बहारदार सादरीकरण केले. त्यांच्या भैरवीनेच कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांना तबल्यावर नंदकिशोर ढोरे, संवादिनीवर पं. प्रभाकर पांडव, पखवाजवर गंभीर महाराज अवचार यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव तळपे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)