चिमुकले हरवले देशसेवेच्या स्वप्नांत

“नो युवर आर्मी’ प्रदर्शन : सलग दुसऱ्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी –चिमुकल्यांचा लष्करातील जवानांची स्वाक्षरी घेण्याचा अट्टाहास, लष्करांच्या जवानामागे धावत जाऊन सेल्फी काढणं अन्‌ औत्सुक्‍याने रणगाडा व तोफाविषयी माहिती घेणं हे दृश्‍य होतं पिंपरीतील एच. ए. मैदानावर भरलेल्या लष्कराच्या प्रदर्शनातील. विद्यार्थी लष्कराच्या जवानांना कुतुहलाने न्याहाळत होते आणि लष्करात जाण्यासाठी काय करायचं आणि तुमचं काम नक्की कसं असतं… कुटुंबापासून दूर राहून तुम्ही कसे काम करता…नक्की काय अडचणी येतात असे निरनिराळे प्रश्‍न कौतुकाने विद्यार्थी जवानांना विचारत होते.

पिंपरी-चिंचवड महापालिका व बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप ऑफ खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवले गेले. पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला 22 हजार नागरिकांची गर्दी झाली होती. तर आज सलग दुसऱ्या दिवशी गर्दी उसळली होती. ही गर्दी लाखाच्या घरात गेली. प्रदर्शनात नागरिकांना भारतीय लष्कराचे इन्फंटरी, आर्म्ड, इंजिनिअर्स, सिग्नल्स, एअर डिफेन्स, मेकॅनाईज्ड आदीमध्ये वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामुग्री नागरिकांना पाहता आल्या. काही यंत्रसामुग्रीवरून प्रत्यक्षात जवानांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करून दाखविली. त्यामुळे विद्यार्थी भाराऊन गेले. लष्कराच्या प्रत्येक यंत्रसामुग्रीची पाहणी व माहिती विद्यार्थ्यांनी जवळून घेतली.

काही विद्यार्थ्यांनी अगदी रणगाड्यावर चढून रणगाड्यांची माहिती जाणून घेतली, भारतीय लष्कराला एवढे जवळून पाहणे, लष्कराच्या वर्दीचा सहवास, असा वेगळा अनुभव हे विद्यार्थ्यांसाठी सर्व नवीन होते. तसेच आर्मीच्या जवानांसाठीही. जवान अगदी खोलात छोट्या मुलांना रणगाड्यांची, तोफांची माहिती देत होते. विद्यार्थीही त्यांना विविध प्रश्‍न विचारून त्यांच्या शंकाचे निरसन करत होते. भारतीय लष्कराचा बॅंड, विविध मार्शल आर्टस आदींची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना करून दाखविली. प्रत्यक्षदर्शनी भारतीय लष्कराने वापरलेली यंत्रसामुग्री पाहून विद्यार्थी आश्‍चर्यचकित होत होते. भारतातील लष्कराविषयी असलेले प्रेम पाहून लष्कराचे जवानही भारावून गेले.

प्रदर्शनाला रविवारी मुदतवाढ
पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच भरलेल्या लष्कराच्या प्रदर्शनाला सलग दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पुणे, पिंपरी-चिंचवडच नव्हे तर जिल्हाभरातून हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी झाली. प्रदर्शनासाठी एक दिवस वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. महापालिकेने त्याची दखल घेत एक दिवसाचा कालावधी वाढवल्याने उद्या (रविवारी) नागरिकांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेचे सह आयुक्‍त दिलीप गावडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)