चिनी सायबरवॉरचा धोका उंबरठ्यावर

      नोंद

ब्रिगेडियर हेमंत महाजन

फेसबुकच्या माहितीचोरीवरून बरेच चर्वितचर्वण झाले. ही चोरी व्यापारी कारणासाठी झाली असल्याचे बोलले गेले. मात्र, आज देशातील बाजारपेठेत सर्वाधिक संख्येने असणाऱ्या चिनी स्मार्टफोन्स आणि चिनी ऍप्सच्या माध्यमातून राजरोसपणाने आपली गोपनीय माहिती आपल्या शत्रूला जात आहे, त्याविषयी कोणी काही बोलताना दिसत नाही. चीनची वाढती आक्रमकता आणि त्यांची एकंदर नीती लक्षात घेता ही बाब अत्यंत गंभीर आहे. यावर उपाय म्हणजे भारतात निर्माण होणारे किंवा दुसऱ्या कंपनीचे फोन वापरणे अन्यथा दुसरा डोकलाम हा सायबर वर्ल्डमध्ये होण्याची शक्‍यता आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून सोशल मीडियावरून भारतीयांच्या माहितीची चोरी हे प्रकरण खूप पुढे आले आहे. परंतु त्याहूनही अधिक महत्त्वाची माहिती चोरली जाते त्याकडे भारतीयांचे लक्ष गेल्याचे दिसत नाही. ही चोरी होत आहे चीनकडून. यासंदर्भात एक प्राथमिक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, ज्यावेळी इतर देश भारतातील नागरिकांची माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते व्यापारीयुद्ध असते. मात्र, पाकिस्तान आणि चीन माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ती बाब सुरक्षेच्या दृष्टीने घातक असते.

म्हणूनच या देशांकडून जी माहिती चोरी केली जाते त्यावर अतिशय बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांत महत्त्वाचे पाऊल उचलले पाहिजे ते म्हणजे चिनी बनावटीच्या सर्व प्रकारच्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची आयात आणि वापर थांबवणे. या वस्तूंची निर्मिती भारतात केली गेली पाहिजे. अनेकांना कदाचित हा राष्ट्रवाद वाटेल किंवा काही जण खुल्या अर्थव्यवस्थेचे, जागतिकीकरणाचे दाखले देऊन हे कसे चुकीचे आहे असे सांगतीलही; मात्र चीनकडून होणाऱ्या या माहिती चौर्याचा धसका अमेरिकेनेही घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी चिनी इलेक्‍ट्रिक वस्तू विकत घेऊ नये कारण त्यामुळे माहितीची चोरी होते, असे तेथील नागरिकांना सांगितले आहे. या आवाहनाची दखल घेत अमेरिकन सरकारच्या दबावाखाली येऊन एका टेलिकॉम कंपनीने आपले चीनबरोबरचे संबंध तोडले.

चिनी लॅंडलाईन फोन आणि स्मार्टफोन यांमधून सरकारी, लष्करी अधिकारी, महत्त्वाचे नागरिक, राजकीय नेते यांची माहिती चोरण्याचे काम चीनने सुरू केले आहे. चिनी इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंमध्ये एक मालवेअर टाकलेले असते. त्यामुळे जो व्यक्‍ती हा मोबाईल वापरतो त्याची माहिती चोरणे शक्‍य होते. आपण असा फोन घेतो तेव्हा अशा प्रकारची मालवेअर त्या फोनमध्ये इनबिल्ट असतात. त्यातून आपली खासगी, गोपनीय माहिती सहजपणे चोरली जाऊ शकते. आज देशात 60 कोटींहून अधिक नागरिक इंटरनेटचा वापर करतात, तर 90 कोटींहून अधिक लोक स्मार्टफोन्स वापरतात. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांची संख्या 40 कोटींहून अधिक आहे. अशा सगळ्या ठिकाणाहून माहितीची चोरी केली जाऊ शकते. चीनची हॅकर्स ब्रिगेड किंवा चायनीज पीपल आर्मी आणि त्यांची गुप्तहेर खाती ही याच कामामध्ये गुंतलेली आहेत. देशात सुरू असणाऱ्या कंपन्यांकडून अशा प्रकारची सर्व माहिती ही चीन सरकारला पुरवली जात आहे.

सध्या रशिया, अमेरिका आणि युरोपमध्ये एक मोठे भांडण सुरू आहे. त्यात रशियाने अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केला असावा अशी माहिती मिळते आहे. ही चोरी इलेक्‍ट्रॉनिक साधनांतूनच होते आणि चोरी झाल्यानंतरही संबंधित व्यक्‍तीला काहीही कळत नाही. म्हणूनच आपण चिनी बनावटीच्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची आयात पूर्णपणे थांबवणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर अशा कंपन्या आपल्या देशात येऊन लायसेन्स प्रॉडक्‍ट तयार करणाऱ असतील तरीही त्यांना थांबवणे गरजेचे आहे. नागरिकांनीही अशा वस्तू भारतीय बनावटीच्या असतील तरच त्याचा वापर केला पाहिजे.

दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्या समुद्रकिनाऱ्यावर खासगी बंदरे बांधली जात आहेत. हे काम ईपी वर्ल्ड या दुबईच्या कंपनीला दिले आहे. या कंपन्या सर्व साधनांना जोडून आपल्या व्यापाराची माहिती गोळा करतात. त्यामुळे खासगी सुरक्षेविषयीची माहिती त्यांच्या इलेक्‍ट्रॉनिक साधनांमधून गोळा केली जाऊ शकते. म्हणूनच अशा प्रकारच्या धोक्‍यांपासून सावध राहिले पाहिजे. त्यासाठी “मेक इन इंडिया’सारख्या कार्यक्रमाला बळ दिले पाहिजे. अमेरिकेच्या गुप्तहेर खात्याने अमेरिका फर्स्ट धोरण अवलंबिले आहेच. भारतानेही असेच धोरण स्वीकारले पाहिजे.

भारत आणि चीनमध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वी चीन सायबर हल्ले करून मोबाइल संवाद, इंटरनेटवरील कामे बंद पाडण्याची चाल खेळू शकतो. आज आपली रेल्वे आरक्षण व्यवस्था जरी बंद पडली तरी किती गहजब माजू शकेल याचा विचार केल्यास संभाव्य सायबर हल्ल्यांमुळे होणाऱ्या हलकल्लोळाचा आवाका लक्षात येईल. आज देशातील बॅंका इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने जोडल्या गेल्या आहेत आणि त्यांचे सर्व व्यवहारही याच माध्यमातून चालत आहेत. या सर्वांवर परिणाम होऊन मोठे नुकसान होऊ शकते.

अशा प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी चिनी वस्तूला देशी पर्याय शोधणे आवश्‍यक आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे. अलीकडील काळात चीन भारताला विविध प्रकारे धमक्‍या देऊन धोरण बदलण्यास भाग पाडत आहे. पण त्याऐवजी देशाची संदेशवहन यंत्रणा बंद पाडली तर त्याला भारत काय उत्तर देईल? मोबाइल संवाद पूर्णपणे बंद झाले तर देशात हाहाकार माजेल. हे सर्व लक्षात घेऊन भारतीय सैन्याने आपल्या अधिकाऱ्यांना चिनी मोबाइल फोन, इतर सामान वापरण्यास मज्जाव केला पाहिजे. अशा प्रकारची सूचना नौदल, हवाई दल यांनीही केली आहे.

एका अंदाजानुसार, आपल्या स्मार्टफोनमध्ये 41 प्रकारची चायनीज ऍप असतात. या ऍपच्या माध्यमातून माहिती चोरली जाते. भारतामध्ये व्हॉटसऍप हे सर्वात लोकप्रिय ऍप आहे. बहुतेक सर्व लोक हे ऍप वापरतात. प्रत्येकाला जणू त्याचे व्यसनच लागले आहे. त्यावर नजर ठेवणे किती सोपे आहे. तसेच मोबाइलवरील बोलण्यातून भारतीय सैन्याची हालचाल, नवी सामग्री, नवे संशोधन ही सर्व माहिती चीनला सहजपणे टिपता येते. मध्यंतरी, संरक्षण मंत्रालयाचे संकेतस्थळ हॅक झाले होते आणि चीनी भाषेत मेसेज येऊ लागले होते. नंतर असे सांगण्यात आले की सिस्टिम फेल्युअर होते आणि कोणतीही माहिती चोरली गेली नसावी; पण असा प्रकार चीनकडून केला जाऊ शकतो. म्हणूनच आता जागे होऊन या घटनांकडे पाहण्याची वेळ आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)