चिनी मांजाचा विळखा कायम

– बंदीनंतर दर घसरल्याने खरेदीला प्रोत्साहन?

अमरसिंह भातलवंडे
पिंपरी – चिनी आणि नायलॉनच्या मांजामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे असले तरी, मांजा विक्री रोखण्यासाठी प्रशासनाने अद्याप कोणेतेही पाऊल उचलले नसल्याचे चित्र सध्या पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळत आहे. यावर्षीही मकरसंक्रांती सणाच्या पार्श्‍वभूमीवर बंदी असलेला “चिनी व नायलॉन’ मांजा बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाला असून त्यांची खुलेआम विक्री होत आहे. विशेष म्हणजे बंदीनंतर मांजाचे दर घसरल्याने खरेदीसाठी एक प्रकारे प्रोत्साहनच मिळत असल्याचे बोलले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मकरसंक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पतंग उडवण्यासाठी लगबग सुरु झालेली असते. पतंग उडवण्यासाठी आवश्‍यक असलेल्या मांजाची विक्रीही बाजारपेठेमध्ये जोरात होत असते. मात्र, मागच्या काही वर्षांपासून पतंगासाठी लागणारा मांजा अधिक मजबूत असावा व तो तुटू नये यासाठी चिनी आणि नायलॉन यासारखा घातक मांजा वापरण्यात येत आहे. या मांजामुळे आत्तापर्यंत अनेकांचे प्राण गेले आहेत. शिवाय मांजामुळे अनेक पक्षीही जखमी झाले आहेत. मांजामुळे होणाऱ्या अपघातांच्या घटना वाढत असल्याने प्रशासनाने आता चिनी मांजाची निर्मिती आणि विक्रीवर बंदी घातली आहे. असे असतानाही, पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातील बाजारपेठेमध्ये हा मांजा खुलेआमपणे विकला जात आहे.

पिंपरी कॅम्प, आकुर्डी, दापोडी, काळेवाडी आदी परिसरात अनेक छोट्या दुकानात मांजाची खुलेआम विक्री सुरु आहे. विशेष म्हणजे लहान मुलांनाही सर्रासपणे हा मांजा विकला जात आहे. यावर्षी तर अशा मांजाची किंमतही कमी झालेली आहे. मागच्या वर्षी चिनी मांजाची किंमत 120 ते 130 रुपये होती. यावर्षी मात्र बंदी असतानाही चिनी बनावटीचा मांजा 85 ते 95 रुपयांमध्ये मिळत आहे. तर साधा मांजा आवघ्या 15 रुपयांमध्ये मिळत आहे. मात्र अनेक ग्राहक चिनी मांजाचीच खरेदी करीत आहेत. त्यामुळे अशा घातक मांजाच्या विक्रीवर पायबंद घालण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मांजाचे पुरवठादार दुचाकीवरुन छोट्या व्यावसायिकांना मांजाचा पुरवठा करताना सर्रास दिसून येतात. त्यामुळे प्रशासनाने मांजा विक्रीवर केवळ दिखाव्यासाठी बंदी घातली का? मांजा विक्रेत्यांवर कारवाई केव्हा होणार? असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत.

घातक मांजाची व्रिक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडुन अनेकदा सांगण्यात आले. मात्र, आत्तापर्यंत अपेक्षीत अशी कारवाई झालेली नाही. पिंपरी-चिंचवड शहरातच 7 ऑक्‍टोबर 2018 रोजी नाशिक फाटा येथील जेआरडी उड्डाणपुलावर मांजा गळ्याभोवती गुंडाळल्याने झालेल्या अपघातात एका महिला डॉक्‍टरचा मृत्यू झाला होता. एक बळी जावूनही मांजा विक्रीवर कारवाई होत नसल्याने प्रशासनाकडूनच मांजा विक्रीसाठी प्रोत्साहन दिले जाते का? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. मकर सक्रांत अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या सणानंतर पतंग मोठ्या प्रमाणात उडवले जातात. त्यामुळे प्रशासनाने आत्ताच अशा घातक मांजा विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

काही दुकानांमध्ये केवळ पतंगाची विक्री
चिनी व नायलॉन मांजा विक्रीसाठी बंदी घातलेली असल्याने काही दुकानदारांनी खबरदारी घेतलेली दिसते. विचारपूस करुनच मांजाची चोरी-छुपे विक्री हे दुकानदार करीत आहेत. शिवाय खात्री पटल्यानंतर हवा तेवढा मांजा उपलब्ध करुन दिला जात आहे. काही दुकानांमध्ये कारवाईच्या भितीपोटी मांजा विक्रीसाठी ठेवण्यात आलेला नाही. पिंपरी येथील कॅम्प परिसरात असणाऱ्या अनेक दुकानात यावर्षी फक्त पतंग विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)