चित्रपट शुटिंगसाठी एलईडी दिवे ‘पिवळे’

पुणे- रस्त्यावरील पांढरे एलईडी दिवे पालिकेचेच ठेकेदार चित्रपट शुटिंगसाठी पिवळे करत असल्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक जयंत भावे यांनी सोमवारी केला. पालिकेची परवानगी न घेता हा प्रकार सुरू असून अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचेही भावे म्हणाले. दरम्यान, जर अधिकारी अशी उत्तरे देणार असतील, तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला दिल्या.

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत भावे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे एरंडवणा, हॅपी कॉलनी (प्रभाग 13) मध्ये सुरू असलेल्या प्रकाराची माहिती दिली. नागिरकांच्या सोयीसाठी पालिकेने या भागात लावलेल्या रस्त्यावरील दिव्यांना पिवळे कागद लावून प्रकाश कमी करण्याचा प्रकार सुरु आहे. एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हा अट्टहास केला जात असून यासाठी पालिकेची मान्यता घेण्यात आलेली नाही. या दिव्यांना हे कागद कशासाठी लावले जात आहेत, याची काहीही माहिती क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे नाही.

पालिकेत येवून वर्षे झाले तरी प्रशासन कसे काम करते’ हे कळत नाही, या शब्दात भावे यांनी नाराजी व्यक्त केली. पालिकेच्या दिव्यांना पिवळे कागद लावण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे लक्षात आल्यानंतर हे काम थांबविण्यात आले होते. पण दोन दिवसापूर्वी याची परवानगी देखील प्रशासनाने दिली असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावर खुलासा करण्याचे आदेश महापौर टिळक यांनी दिल्यानंतर विद्युत विभागाचे प्रमुख रामदास तारू यांनी यावर खुलासा करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराबद्दल माहिती नसल्याचे उत्तर तारु यांनी दिल्याने सभासद आणखी आक्रमक झाले. चुकीच्या पद्धतीने विद्युत विभागाचा कारभार सुरू असून नगरसेवकांचे चेहरे पाहून प्रभागात एलईडी दिवे देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

प्रभागात वारंवार मागणी करुनही एलईडी दिवे दिले जात नसल्याची तक्रार अनेक सभासदांनी केली. पालिका अधिकाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या उत्तरांबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना महापौर टिळक यांनी अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांना दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)