चिखलीतील 90 अनधिकृत गोदामांवर बुल्डोजर

पिंपरी – वर्षानुवर्षे अनधिकृतपणे थाटलेल्या अनधिकृत भंगार मालांच्या गोदामांवर महापालिकेने अखेर बुल्डोजर फिरवला. या धाडसी कारवाईमध्ये दहा एकर जागेतील 90 अनधिकृत गोदामे अतिक्रमण पथकाने भुईसपाट केली. कारवाईला सुरूवातीला विरोध झाला. मात्र, पोलीस व महापालिकेच्या फौजफाट्यापुढे भंगार व्यावसायिकांनी माघार घेतली.

चिखलीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे भंगार मालाची दुकाने आणि गोदामे सुरू केली आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा, रद्दी, प्लॉस्टिकच्या वस्तू असा भंगार मालांची गोडावून आहेत. या भागात मोठ्या प्रमाणावर भंगार जाळले जात आहे. त्यातून वारंवार आगीच्या घटना घडत आहे. त्यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. सतत धुराच्या त्रासात येथील रहिवाशांना वावरावे लागते. आगीच्या घटनांमध्ये अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह अनेकांचे बळी गेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या गोदामांवर कारवाईची मागणी होत होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, पर्यावरण आणि भंगार मालाच्या गोदामांसंदर्भात महापालिकेत नुकतीच बैठक झाली. त्यावेळी आमदार महेश लांडगे यांनी भंगार व्यावसायिकांना नोटीसा देण्याचे आदेश दिले होते. प्रदूषण रोखण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अनधिकृत बांधकाम निर्मुलन पथकास कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाने भंगार व्यावसायिकांना नोटीसा बजावल्या होत्या. तसेच पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती.

आज सकाळी अकराच्या सुमारास रिव्हर रेसीडेन्सी परिसरात कारवाईला सुरूवात झाली. क आणि फ क्षेत्रीय कार्यालयाने एकत्रित ही कारवाई केली. सुरूवातीला कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न येथील व्यावसायिकांनी केला. मात्र, कारवाई होणारच, अशी भूमिका अतिक्रमण विरोधी पथकाने घेत कारवाईला सुरूवात केली. महापालिका आणि पोलिसांचा फौजफाटा पाहून अखेर विरोध करणाऱ्यांनी माघार घेतली. सुमारे दहा एकर क्षेत्रात आणि 1 लाख 10 हजार 968 चौरस फूट जागेतील 90 गोदामे हटविण्यात आली. सायंकाळी चार वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.

सह शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता संजय खरात, प्रकाश साळवी, हेमंत देसाई, शिवाजी चौरे, नितीन निंबाळकर, चिखलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर तसेच महापालिकेचे 8 कनिष्ठ अभियंता, 15 बीट निरिक्षक, अतिक्रमण व निर्मूलन पथक, दोन पोलीस निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक, 80 पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई फत्ते केली. 5 जेसीबी, 1 ट्रक, 10 मजुरांचा वापर कारवाईसाठी करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)