चिऊताई चिऊताई दार उघड… 

अनुराधा पवार 

चिऊताई, चिऊताई दाऽऽऽऱ उघड’ लहानपणी अगदी समजायला लागल्यापासून हे वाक्‍य असंख्य वेळा ऐकले आहे, म्ह्टले आहे. अगदी तालासुरात. 
कावळा आणि चिमणी या गोष्टीतील हे वाक्‍य. कावळा आणि चिमणी ही गोष्ट अगदी प्रथम मी केव्हा ऐकली हे आता आठवतही नाही, पण नुकते समजायला लागल्यापासून किंवा कदाचित त्याहीपूर्वी ही गोष्ट ऐकली आहे. समजायला लागल्यावर माझ्या आजीच्या तोंडून ही गोष्ट अनेकदा ऐकली. मी एकटीनेच नाही, तर आम्हा भावंडांनी मिळून. आम्ही सहा भावंडे होतो. रात्री आजीच्या भोवती कोंडाळे करून गोष्टी ऐकण्याचा अगदी भरपूर आनंद लुटला आहे आम्ही. किती तरी अदभुतरम्य गोष्टी आम्ही ऐकल्या. काही गोष्टी तर दोन-दोन-तीन-तीन दिवस चालत. पण ही कावळा आणि चिमणीची गोष्ट मात्र अगदी मनात ठसून गेली आहे. नेहमी आठवते. आजीकडून ती ऐकताना “चिऊताई चिऊताई दार उघड हे घोषवाक्‍य आम्ही भावंडे अगदी एका सुरात म्हणायचो.

एक होता कावळा, एक होती चिमणी’ अशी आजीच्या गोष्टीची सुरुवात असायची. कावळ्याचे घर होते शेणाचे, चिमणीचे घर होते मेणाचे…. एकदा काय झाले मोठा पाऊस आला. कावळ्याचे घर गेले वाहून. आणि मग त्यानंतर गोष्टीला खरा रंग भरायचा. कावळा चिमणीकडे जातो. म्हणतो, चिऊताई, चिऊताई दार उघड…. मग चिमणी म्हणायची, थांब माझ्या बाळाला तेल लावू दे, आणि पुढे थांब माझ्या बाळाला न्हाऊ घालू दे, पुसू दे, तीट लावूदे, पावडर लावूदे, कपडे घालूदे-यात झबले, टोपडे आदी अनेक प्रकार यायचे. हे खूप वेळ चालत राहायचे आणि आम्ही लक्ष देऊन ऐकायचे. कावळा म्हणाला, “चिऊताई चिऊताई दार उघड’ हे आवडीने म्हणत राहायचो.

ही गोष्ट लहानपणी मी भावंडांसह ऐकली. पुढे माझ्या मुलांना सांगितली आणि माझ्या नातीला-परीलाही सांगितली. गोष्ट तीच, पण ऐकणाऱ्या-सांगणाऱ्या पिढ्या बदलत गेल्या. गोष्ट ऐकण्याचा उत्साह, उत्सुकता बदलत गेली. माझ्या मुलांमध्ये ती कमी झालेली मला जाणवली आणि माझ्या नातीत तर गोष्टी ऐकण्याची आवडच नाही. अर्थात त्याला कारणे वेगळी आहेत. माझ्या लहानपणी तशी मनोरंजनाची साधने कमीच होती. गोष्टी ऐकणे-वाचणे हा सर्वात सुलभ आणि आवडता प्रकार होता. रेडियो होता, पण किलबिलसारखे मुलांसाठी कार्यक्रम दुर्मीळच होते आणि ते त्याच्या वेळेत ऐकावे लागत. त्यामुळे गोष्टी ऐकणे-सांगणे याला पर्याय नव्हता, त्याची आवड आपोआप वाढ्‌त गेली. वाचनाची आवड वाचत गेली.
माझ्या मुलांच्या वेळी टीव्ही आला होता. दिवसभर मनोरंजनाचे कार्यक्रम होते, व्हिडीयो गेम सुरू झाले होते. कार्टून यायला लागली होती आणि अभ्यास वाढला होता. या सर्वात गोष्टींची ओढ कमी होणे साहजिक होते.

आणि नातीच्या वेळी तर मनोरंजनाचा नुसता पूर आला आहे. पूर म्हणणे अगदी दरिद्रीपणाचे होईल. त्सुनामी आली आहे, त्सुनामी. त्यात मुले हरवत चालली आहेत, त्यांचे निर्व्याज बालपण हरवत चालले आहे आणि ते हरवत चालले आहे याची पालकांची जाणीवसुद्धा हरवत चालली आहे. आता टीव्ही, डीव्हीडी वगैरे जुनाट झाले आहे. त्यांची जागा घेतली आहे स्मार्ट फोनने. नेटने, गेम्सनी आणि त्यात सारे काही भरले आहे. अनियंत्रितपणे.
तेव्हा गोष्टी सांगणे-ऐकणे इतिहासजमा होत आहे. कावळा चिमणीची गोष्ट आम्ही लक्ष देऊन निमूटपणे ऐकायचो, माझी मुले शंका काढत ऐकायची. कावळा चिमणीकडेच का गेला? दुसऱ्या कावळ्याकडे का नाही गेला. त्याच्याकडे छत्री नव्हती का अशा आम्हाला न सुचलेल्या रास्त शंका ती विचारायची.

परीची तर तऱ्हाच वेगळी. चिमणीच्या घराला दार कुठून आले? दार होते तर बेल का नव्हती? असली तर कावळ्याने वाजवली का नाही? चिमणीच्या घरात दार उघडायला कोणी नव्हते का? चिमणी मुद्दाम असे करते हे कावळ्याला कळले कसे नाही? कावळा तर हुशार असतो. हा बावळट कसा? हे प्रश्‍न ऐकल्यावर तिला या गोष्टी न सांगण्यात शहाणपणा आहे, इतका शहाणपणा माझ्या अंगी आला.
मग माझ्या मनात विचार आला. आताची मुले विचार करतात, शंका काढतात, बिनदिक्कत विचारतात. आम्ही लहानपणी लाजरेबुजरे (खरं तर बावळट) होतो. आजही काही कमी नाही आहोत.

लहानपणी कावळ्याने “चिऊताई चिऊताई दार उघड म्हटल्यावर चिऊताईचे “थांब माझ्या बाळा न्हाऊ घालूदे सारखी कारणे चुपचाप ऐकली आणि आताही सरकारची कारणे आयुष्यभर ऐकतच आहोत. आलीगेली सरकारे गरिबी दूर करणार, स्वस्ताई करणार, प्रदूषण दूर करणार, सुखसोई करणार, घरे देणार, बॅंकेत पैसे टाकणार असे सांगत आली. आणि आम्ही सरकार सरकार गरिबी हटाव, स्वस्ताई कर किंवा अन्य काहीही मागणी केली, की ती पुरी करण्याऐवजी सरकार गोष्टीतल्या चिमणीप्रमाणे “थांब माझ्या……’ अशी काही तरी थाप मारणार. ती आम्ही चुपचाप ऐकून घेणार. याला काय इलाज?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)