चिऊताई चिऊताई दार उघड

माझ्या नातवाला छोट्या रोहितला, मी आपली नेहमीची चिऊताईची गोष्ट सांगत होते. कावळा आला होता चिऊताईकडे आणि तिला दार उघडायला सांगत होता. चिऊताईचे आपले थांब, माझ्या बाळाला आंघोळ घालते, थांब माझ्या बाळाला कपडे घालते, चालू होते. शेजारीच बसलेली मिहिका म्हणाली, मग आजी 8/10 दिवसांपूर्वी हेच सांगितले होतेस की, आता कावळा कदाचित, वेगळे काही तरी सांगायला आला असेल आणि बाळंही आता थोडी मोठी झाली असतील ना, घालतील ना ती आपले-आपले कपडे, तिच्या या वाक्‍याने मी एकदम चमकलेच, खरेच आताची पिढी शार्प आहे खरी. वर्षानुवर्षे आपण ही गोष्ट ऐकतोच, पण आपल्या मनात कधीसुद्धा असे काही वेगळे विचार आलेच नाहीत.

खरेच वेगळे विचार मनात आले तरच, हातातून काही तरी वेगळी कृती घडेल ना !
आईपणाची झुल काय चढली अंगावर आणि एक नशा चढल्या सारखेच झाले मला ऑफिसात द्यावा लागणारा सक्तीचा वेळ सोडला, तर माझ्या बाळापुढे काही दिसेनासेच झाले मला. त्यांना पहाताच सारा शिणवटा गळून जायचा. अगदी त्या घरातल्या चिमणीसारखे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गोष्टीतला कावळा जसा तिला दार उघडण्याचा आग्रह करायचा, तसेच अनेक जण माझ्या घरट्यापाशी यायचे, मला हाका मारायचे नेहमीच काही त्यांच्या गरजेपोटी नव्हे, मी दार उघडून त्यांच्याशी नीट बोलले असते तर मला कळले असते नां.
मला आठवते शेजारची वेदवती एकदा मला बोलवायला आली. आपल्या इथे ना नवे एक मंडळ सुरू झालायं. दर गुरुवारी वाचन-लेखनाची आवड असलेल्या साऱ्याजणी आम्ही तिथे जमतो. ती सांगत होती. एकदा आवडलेल्या पुस्तकावर चर्चा करता. कोणी काही नवे लिहले असेल, तर वाचून दाखवतो. कधी-कधी प्रसिद्ध लेखक लेखिकांनाही बोलवतो. फार छान वाटते. तुलाही वाचनाची आवड आहे, चल ना तिथे!

हो गं, गुरुवार म्हणजे अनुपमचा जिम्नॉस्टिकचा क्‍लास असतो. शाळेतून आल्यावर गरमागरम काही तरी खायला हवे असते नां.

अ ग दुपारीच करून ठेव. तो घेईल ना ओव्हनमधे गरम करून, वेदवती म्हणाली, मलाही सोबत होईल. चल नां, नाही ग, शाळेतून आल्यावर शाळेतल्या गमती-जमती पण सांगायच्या असतात, त्याला तू जा आपली म्हणत मी आनंदाचे एक दार बंद केले.

लहानपणापासून मला गाण्याची खूप आवड होती. काम करण्याकरता अखंड गुणगुणत असायचे मी. माझी मैत्रिण नुपुराने तोटी योग आणला, चल ग, एकादा दिवस, तुझ्या सोयीने वेळ निवड म्हणाली. पण मी क्‍लासला नाव घातल्यावर मधुरा तणतणली. म्हणजे मला स्विमिंगच्या क्‍लासला सोडायला येणार नाहीस तू, शिवाय घरी यायला तुला उशीर होणार म्हणजे जेवायला उशीर, दुसऱ्या दिवशीचे शाळेचे कपडे, डान्सच्या क्‍लासची तयारी, सगळे मलाच बघावे लागणार, तिच्या रागाने फुगलेले गाल पाहून तिचा रूसवा काढण्यासाठी मी लगेच पालकाच्या पुऱ्या तळायला घेतल्या; गाण्याच्या क्‍लासचा विचार लगेचच काढून टाकला.

गोष्टीतल्या चिमणीने जसे थांब माझ्या बाळाला पावडर लावते, थांब माझ्या बाळाला कपडे घालते, थांब माझ्या बाळाला जेऊ घालते घालते केले, तसेच थांब माझ्या बाळाच्या कपड्याला इस्त्री करून ठेवते, थांब माझ्या मुलाला गरम-गरम जेवण वाढते, थांब माझ्या बाळांची दप्तरे आवरते. थांब माझ्या बाळाचे डबे भरते, असे प्रत्येक संधीला, प्रत्येक दार ठोठवणाऱ्याला मी थांब जरा म्हणत बसते.

का नाही मी इतरांप्रमाणेच स्वतःचा पण विचार केला, मुले मोठी झालीत, आपापली कामे करू शकतात, नव्हे त्यांना तसे शिकवायलाच हवे, तरच मलाही काहीतरी शिकता येईल, स्वतःचे कलागुण जोपासता येतील. स्वतःचे विश्‍व उभे करता येईल. मुले तर काही दिवसांनी मोठी होणार स्वतःच्या विश्‍वात रमणार, तुमच्याशी बोलायला त्यांच्याकडे एवढा वेळही नसेल.

तेव्हा चिमणाबाई तुम्ही पण जाग्या व्हा. थोडेसे तुमच्या घरट्यांचे दार किले-किले करा. बाहेरचे जग तुम्हाला हाक मारतयं तोवरच त्याला साद द्या. कोण काय सांगतयं ते नीट ऐका! चिऊताई चिऊताई दार उघड, बाळ मोठी झालीत आता!

– सुप्रिया साठे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)