चिऊताईसाठी एक पाऊल!

जागतिक चिमणी दिन : पक्षी प्रेमींकडून चिमणीसाठी 100 कृत्रिम घरटी!
– इंदोरी कान्हेवाडीतील तरुणांचा स्तुत्य उपक्रम
– चिमण्यांचा हरवलेला “चिवचिवाट’ पुन्हा कानी येऊ द्या!
तळेगाव दाभाडे, दि. 20 (वार्ताहर) – मावळ तालुकातील पूर्व भाग इंदोरी (भंडारा डोंगर) पर्यटनस्थळे व निसर्गरम्यतेमुळे प्रसिद्ध आहे. मात्र, वाढत्या नागरीकरणामुळे तालुक्‍यातील पक्ष्यांचे प्रमाण कमी झाले आहे. इंदोरी शहरात तर चिमण्यांचा “चिवचिवाट’ हरवल्यासारखाच आहे. हे लक्षात घेऊन तरुणांनी एकत्र येऊन चिमण्यांसाठी 100 कृत्रिम घरटी तयार केली असून ती झाडावर ठेवण्यात आली आहेत.
मावळ तालुक्‍यातील डोंगर-दऱ्यांत साग, बाभुळ, भेंडी, बोर, कळक, बांबू, आंबा, चिंच, जांभुळ, नीलगिरी आदी झाडे आहेत. गेल्या काही वर्षांत डोंगर-दऱ्यांमध्येही बंगले, फार्म हाऊस बांधण्यात आली आहेत. मानवी वावर वाढल्याने आणि पर्यावरणाची काळजी न घेतल्याने अनेक ठिकाणी निसर्गाचा ऱ्हास होताना दिसत आहे. वाढलेल्या सिमेंटच्या जंगलामध्ये मोबाइल टॉवरची गर्दी दिसत आहे. काही टॉवर हे घराच्या स्लॅबवर आहेत. मोबाईल टॉवरमुळे चिमण्यांचे प्रमाण कमी झाले आहे.
इंदोरी मावळ येथील पक्षीप्रेमी ऋषिकेश लोंढे, भूषण ढोरे, अजिंक्‍य येवले, तुषार दिवसे, हर्षद दोंदे, गणेश हिंगे, विनोद येवले, धर्मनाथ दिवसे, नितीन पवार, उमेश येवले, रोहिदास खैर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कृत्रिम घरटी केली.
जागतिक चिमणी दिनानिमित्त चिमण्यांच्या निवाऱ्यासाठी सुमारे 100 कृत्रिम घरटे लावण्यात आले आहेत. इंदोरी तसेच कान्हेवाडी परिसरात हा उपक्रम पार पडला.
घरे, रस्त्यांमुळे चिमण्या दिसेनाशा झाल्या आहेत. पूर्वीच्या घरांची रचना चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी सोयीची होती. परंतु आता कॉंक्रीटची जंगले उभी झाली. त्यामुळे चिमण्यांनी देखील काढता पाय घेतला, असे भारतातच नाही, तर युरोप, आफ्रिका खंडातही चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे अभ्यासकांना दिसून आले आहे.
आजच्या स्थितीत ज्या चिमण्या आहेत त्यांच्या रक्षणासाठी फ्लॅट, घराचे टेरेस, खिडक्‍यांवर दाणा-पाण्याची व्यवस्था करा. चिमण्यांना पाण्यात बागडायला खूप आवडते. त्यामुळे मोठ्या पात्रांमध्ये पाणी ठेवा. चिमणीसाठी अन्न, पाणी, निवाऱ्याची सोय करू शकलो, तर चिमणी पुन्हा पूर्वीप्रमाणेच चिवचिव करीत आपल्या घर-अंगणात संचार करू लागेल. पुढच्या पिढीपासून चिमणी दुरावू नये म्हणूनही आताच काळजी घ्या.
– ऋषिकेश लोंढे.
पक्षी मित्र.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)