“चिंधी’तून सक्षमीकरण

प्रांजली देशमुख  

महिला सक्षमीकरणासाठी सरकारी आणि खासगीपातळीवर अनेक उपक्रम राबवले जातात. विशेषत: ग्रामीण भागातील महिला अधिक शिक्षित आणि जागरूक राहावी यासाठी सातत्याने सरकारी यंत्रणा कार्यक्रम राबवत असते. त्यात काही स्वयंसेवी संस्थाही मदत करत असतात. महिलांना स्वबळावर उभे राहण्यासाठी बचत गटाचा मोठा वाटा राहिलेला आहे. त्याचवेळी वाया गेलेल्या वस्तूंपासून पुन्हा नवीन वस्तू तयार करणे हा देखील महिलांना स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे.मुंबईची तनुश्री शुक्‍ला ही महिला फॅशनमध्ये रुची ठेवणारी आणि पर्यावरणवादी आहे. यातूनच “चिंदी’ कंपनीचा उदय झाला. कपड्याच्या दुकानातून किंवा टेलर्सच्या दुकानातून वाया जाणारे कापड पुन्हा उपयोगात आणून त्यापासून वस्तू तयार करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. याकामी तनुश्री यांना उत्तर भारतातील गरजू महिलांची चांगली साथ लाभली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तनुश्री शुक्‍लाकडे घरगुती कपड्याचा व्यवसाय होता. यादरम्यान तिने वाया जाणारे कापड पाहिले. वाया जाणाऱ्या कपड्यांचे तुकडे किलोच्या घरात जात आणि दिवसाखेर कचऱ्याच्या पेटीत
फेकून दिले जात असत. त्याला आपण चिंधी असेही म्हणतो. या चिंधीचा वापर एखादी वस्तू तयार करण्यासाठी करता येईल का, हा विचार तिने केला. बरेच दिवस विचार केल्यानंतर तिने “चिंदी’ या नावानेच मुंबईत एक संस्था स्थापन केली आणि स्थलांतरीत झालेल्या महिलांना रोजगार देण्यास सुरुवात केली. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी चिंदी कंपनीने पुढाकार घेतला. कापडांच्या तुकड्यापासून वस्तू करण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले.

टी-शर्ट तयार करताना अनेकदा कपडा वाया जातो. तो एकत्र करण्यावर अगोदर भर देण्यात आला आणि त्यापासून हाताने वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. 2015 मध्ये मानखुर्द येथे चिंदीची सुरवात झाली. तेथे चिंदी महिला केंद्रांची स्थापना करण्यात आली. या केंद्रात उत्तर भारतातील महिलांचा भरणा अधिक होता. कामाच्या निमित्ताने उत्तर भारतातील अनेक कुटुंबे महाराष्ट्रात येतात आणि मिळेल तेथे राहण्यासाठी जातात. अर्थार्जनाचे साधनकही कमीच असल्याने तुटपुंज्या कमाईवर कुटुंब जगत असतात. अशा स्थितीत या महिलांना रोजगार दिल्यास हातभार लागेल, असा उद्देश समोर ठेवण्यात आला. तसेच उत्तर भारतातील महिला विणकामात हुशार असल्याने त्याचा फायदा चिंदी कंपनीला झाला. अनेक ठिकाणी स्थलांतर केल्याने या महिला विणकाम विसरून गेल्या होत्या. चिंदीच्या निमित्ताने त्या पुन्हा प्रवाहात आल्या. प्रत्येक महिलांना त्यांच्या सोयीनुसार कामावर येण्याची मूभा देण्यात आली. या महिलांना कामाच्या बदल्यात योग्य मोबदला दिला जावू लागला. साहजिकच महिलांचा ओढा वाढला गेला.

बहुतांशी महिला घर सांभाळण्याचेच काम करतात. शिक्षणाचे प्रमाण खूपच कमी असल्याचे तनुश्री सांगतात. शिवणकाम आणि विणकामात पारंगत असलेल्या या महिलांनी तयार केलेल्या वस्तू ड्रेस डिझायनरकडे पाठवण्यात आल्या. या कपड्यापासून बाथ मॅट, ज्वेलरी, गोधडी, पर्स यासारख्या वस्तू तयार करण्यात आल्या. शून्य कचरा हा उद्देश ठेवून महिलांनी कपड्यांच्या तुकड्याचा वापर सुरू केला. मानखूर्दप्रमाणे अन्य शहरात या वस्तूची निर्यात होऊ लागली आणि त्यापासून पुन्हा नव्याने वस्तू तयार केल्या जावू लागल्या.

अलिकडच्या काळात हाताने तयार केलेल्या वस्तूला मागणी वाढली असून त्याची किंमतही लोकांना कळू लागली आहे. सध्या चिंदी कंपनीत सहा विणकरी महिला असून एक व्यवस्थापक आणि प्रशिक्षक असून नानाविध वस्तू तयार करण्यात त्या दिवसरात्र गुंतलेल्या असतात. कुटुंब आणि कंपनी यात उत्तमरित्या मेळ साधणाऱ्या या महिलांमुळे चिंदी कंपनीची दमदार वाटचाल सुरू आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)