अग्रलेख | चिंता वाढवणारी ‘ताकद’

गेल्या काही वर्षांमध्ये आशिया खंडातील महासत्ता असलेल्या चीनने अमेरिकेला शह देण्यास सुरुवात केली. विशेषतः शी जिनपिंग राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून चीनच्या या आक्रमकतेमध्ये वाढ होत गेली. आशिया खंडातील राजकारणामध्ये अमेरिकेने नाक खुपसू नये, आशियातील प्रश्‍नांची उत्तरे आशियाई देशांनीच सोडवावीत ही भूमिका चीन जाहीरपणाने मांडत आला. हे करत असताना दुसऱ्या बाजूला आशिया खंडातील आपल्या शेजारी राष्ट्रांसोबत असणाऱ्या सीमावादांसंदर्भातही चीनने आक्रमक भूमिका घेतलेली दिसून आली. आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रतिस्पर्ध्याला अथवा कोणत्याही देशाला आव्हान देताना, त्याच्यावर कुरापत करताना प्रत्येक देश आपले सामर्थ्य जोखत असतो. किंबहुना, आपल्या सामर्थ्यामध्ये वाढ करून मगच असे साहस केले जाते. चीननेही हेच केले. आपली सामरिक सज्जता कमालीची वाढवून मगच चीनने आपल्या विस्तारवादाला आक्रमकतेची जोड दिली.

भारताला सर्व बाजूंनी घेरण्यासाठी चीनने भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये असंख्य विकास प्रकल्प हाती घेतले आहेत. यासाठी या देशांना भरभक्‍कम कर्जाऊ रक्‍कम देऊ केली आहे. श्रीलंका, बांगला देश सारखे देश चीनच्या या कर्जाच्या ओझ्याखाली अक्षरशः दबले गेले आहेत. चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडॉरच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करून आधीच आपल्या आश्रयाला आलेल्या पाकिस्तानला पूर्णपणाने गिळंकृत करण्याचा चीनचा डाव लपून राहिलेला नाही. अशाच प्रकारे मालदीव, नेपाळ या देशांनाही चीन आपल्या कह्यात घेत आहे.

जिनपिंग यांच्या कार्यकाळात चीनचा लष्करावरील खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला. त्यांनी लष्कराचे वेगाने आधुनिकीकरण केले. नौदलावरील खर्चात वाढ केली. संरक्षण क्षेत्रावर खर्च करणाऱ्या जगातल्या पहिल्या देशांमध्ये चीन दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. जगभरात होणाऱ्या संरक्षण खर्चाच्या 13 टक्‍के खर्च चीन करतो. त्या जोरावर दक्षिण चीन समुद्र, हिंदी महासागरावर आपला दावा सांगण्यास चीनने सुरुवात केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर सुरुवातीच्या काळात चीनवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला; मात्र चीन बधला नाही. त्यामुळेच ट्रम्प यांना दोन पावले मागे जावे लागले. ट्रम्प यांनी सुरुवातीच्या काळात दक्षिण चीन समुद्रात पाठवलेल्या पाणबुडीचा चीनने कशा प्रकारे पाठलाग केला आणि त्यानंतर काय झाले हे जगाने पाहिले. एका बाजूला आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सत्तासमतोलात चीनला केंद्रस्थानी आणत असताना शी जिनपिंग यांनी देशांतर्गत पातळीवर आपल्या विरोधकांचा, प्रतिस्पर्ध्यांचा अत्यंत योग्य रीतीने बंदोबस्त केला. भ्रष्टाचारविरोधी व्यापक मोहीम हातात घेऊन जिनपिंग यांनी देशांतर्गत विरोधक हा मुद्दाच निकाली काढला. यातून त्यांनी चीनवर स्वतःची पकड मजबूत केली. आता जिनपिंग हे चीनचे तहहयात अध्यक्ष बनणार आहेत.

-Ads-

यासाठी त्यांनी चीनच्या राज्यघटनेमध्ये असणारी कित्येक दशकांपासूनची तरतूद काढून टाकली आहे. माओ त्से तुंग यांच्यानंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या डेंग शियाओपेंग यांनी 1982 मध्ये राज्यघटनेमध्ये एक कलम समाविष्ट केले. त्यानुसार चीनमध्ये कोणत्याही व्यक्‍तीला दोनपेक्षा अधिक वेळा राष्ट्राध्यक्ष होता येत नाही. राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. याचाच अर्थ 10 वर्षांहून अधिक काळ कोणतीही व्यक्‍ती चीनची राष्ट्राध्यक्ष बनू शकत नाही. डेंग यांचा हा निर्णय महत्त्वपूर्ण होता. व्यक्‍तीकेंद्रित सत्ताव्यवस्थेच्या मर्यादा आणि तोटे लक्षात घेऊन तो घेण्यात आला होता. एकाच व्यक्‍तीकडे अमर्याद, अनिर्बंध सत्ताधिकार असल्यास त्याचे दुष्परिणाम देशाला भोगावे लागतात.

हिटलरसारख्या हुकूमशहाचे उदाहरण यासाठी पुरेसे बोलके आहे. त्यामुळेच सत्ताधिकार हे सामूहिक नेतृत्वाकडे असावेत या हेतूने डेंग यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्यकाळाला मर्यादा घातल्या. शी जिनपिंग हे 2013 मध्ये पहिल्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. चालू वर्षी त्यांचा पहिला कार्यकाळ संपणार आहे आणि दुसऱ्या कार्यकाळाची सांगता 2023 मध्ये होणार आहे. मात्र तत्पूर्वीच त्यांनी ही घटनादुरुस्ती घडवून आणली आहे. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने दोन वेळाच अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद हा नियम मोडीत काढणारी घटनादुरुस्ती अआता जिनपिंग यांनी घटनादुरुस्ती केली आहे. ती 2958 विरुद्ध दोन अशा बहुमताने मंजूरही झाली आहे. त्यामुळे आता चीनमध्ये एकनेता पद्धती असेल आणि तो नेता म्हणजे शी जिनपिंग हेच असतील. जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच चिंतेची ही घडामोड आहे. याचे कारण जिनपिंग हे आता अमर्याद ताकद असणारे सत्ताधीश बनले आहेत. माओनंतर सर्वांत शक्‍तिशाली नेते म्हणून त्यांचा उदय जागतिक राजकीय पटलावर झालेला आहे. भारतासह दक्षिण आशियातील देशांबाबत चीन अवलंबत असलेले जिनपिंग यांच्या कार्यकाळातील धोरण लक्षात घेता ही चिंता किती यथार्थ आहे हे लक्षात येते. आज भारताला सर्व बाजूंनी घेरण्यासाठी चीनने भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये असंख्य विकास प्रकल्प हाती घेतले आहेत. यासाठी या देशांना भरभक्‍कम कर्जाऊ रक्‍कम देऊ केली आहे.

श्रीलंका, बांगला देश सारखे देश चीनच्या या कर्जाच्या ओझ्याखाली अक्षरशः दबले गेले आहेत. चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडॉरच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करून आधीच आपल्या आश्रयाला आलेल्या पाकिस्तानला पूर्णपणाने गिळंकृत करण्याचा चीनचा डाव लपून राहिलेला नाही. अशाच प्रकारे मालदीव, नेपाळ या देशांनाही चीन आपल्या कह्यात घेत आहे. ही सर्व साखळी विणता विणताच कधी अरुणाचल प्रदेश, तर कधी डोकलाम तर कधी लडाखसारख्या भागात घुसखोरी करून, टिप्पण्या करून भारताविरुद्ध कुरघोड्या करण्याचा उद्योग चीन करत आहे. जिनपिंग आजीवन अध्यक्ष बनल्यानंतर या सर्व रणनीतीला वेग येणार आहे. “मूंह मे राम बगल मे छुरा’ हे चीनचे सुरुवातीपासूनच धोरण राहिले आहे. त्यामुळेच इतकी महत्त्वपूर्ण घडामोड घडत असताना चीन आता भारताने मैत्रीसंबंध कायम ठेवल्यास दोन्ही देशांचा कशा प्रकारे फायदा आहे हे सांगत आहे. ओबीओआरला पाठिंबा देण्याबाबत भारताने दिलेला नकार, दलाई लामांसोबतची भारताची जवळीक, व्हिएतामशी दृढ बनत चाललेले भारताचे संबंध आणि भारताची अमेरिकेसोबतची गाढ मैत्री यांबाबत चीनने उघड नाराजी वेळोवेळी प्रकट केलेली आहे. येणाऱ्या काळात कूटनीती, व्यूहरचनात्मक रणनीती आखत सामरिक तसेच आर्थिक-व्यापारी कोंडी करत चीन भारताला नामोहरम करण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न करेल. म्हणूनच भारताने येणाऱ्या काळात चीनसोबतच्या संबंधांबाबत नव्याने विचार करण्याची गरज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

1 COMMENT

  1. वरील अग्रलेख वाचण्यात आला हिटलर सारख्या हुकूमशाहाच्या बोलक्या उधाहरणाची जशी आपल्या समस्त भारतीयांना आहे तिचं कल्पना शी जिनपिंग ह्यांना नक्कीच असावी हिटलरचा मृत्यू जसा झाला तसा आपला व्ह्यावा अशी इछा शी जिनपिंग नक्कीच करीत नसावेत प्रत्येक मनुष्यात जसे चांगले गुण असतात तसेच वाईट गुण सुद्धा असतात एखाद्या दुर्गुण व्यक्तीतील जर चांगले गुण आत्मसात केलेत तर अशी व्यक्ती दुर्गुणी ठरू शकते का ? चीन मध्ये जरासे खातंतू झालेकी आपल्या भारतीयांचे धाबे दणाणते ह्याचे कारण आपण आपली पाठ कितीही थोपटली आपल्याच तोंडानी आपली स्तुती कितीही केली तरी प्रत्यक्ष वास्तूथिती त्याच्या उलट असते आज चीन मध्ये झाडू मारणारा आपल्याकडील ब्यांक म्यानेजरचा पगार कमावतो सर्वच बाबतीत भारत व चीनची तुलना केली तर किती बाबतीत आपण चीनच्या वरचढ ठरू ?आपली अगतिकता हीच आपल्या नाशास कारणीभूत ठरत आहे हे वास्तव कितीही झाकण्याचा पर्यटन केला तरी झाकल्या जाणार नाही हे त्रिवार सत्य आहे आज आपण इस्त्रायल स्वीडन फिलँड स्वझर्लंड अशा देशांच्या तुलनेत विज्ञान तंत्रज्ञानातील उत्पादनाच्या बाबतीत मागे आहोत हे कशाचे द्योतक समजावे ?आपला देश लोकशाही प्रधान देश नसून खोटा स्तुतिप्रधान देश आहे इथेच आपलं घोड पेंड खात हे सर्वाचं मूळ कारण आहे त्याच कारणानेच आपल्या सर्वच चिंतांचे ताकद व्हाडात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)