#चिंतन: सर, वुई आर सॉरी!

डॉ. दिलीप गरूड

पुण्याच्या पूर्व भागातील इंग्रजी माध्यमाची एक नामांकित शाळा. पावसाळ्याचे दिवस होते. दुसऱ्या तासाला नववीच्या वर्गावर तेलीचरी सर गणित शिकवायला आले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मुलींच्या बुटांसोबत थोडासा चिखलही वर्गात आलाय.फळ्याजवळही थोडी माती आणि चिखल होता. ते समोर बसलेल्या मुलीला म्हणाले, “”तो कोपऱ्यातला झाडू घेऊन, इथलं जरा लोटून घे. म्हणजे मला शिकवायला सुरुवात करता येईल.” आपण हातात झाडू घेऊन झाडायचं ही कल्पना त्या मुलीला रुचली नाही. ती जाहीरपणे म्हणाली, “”नो सर.” मग तेलीचरी सरांनी दुसऱ्या मुलीला म्हटलं, “”तू घे गं लोटून.” तर तिनेही नकार दिला. तेव्हा तेलीचरी सरांच्या लक्षात आले की मुलींना वर्ग झाडण्याचं काम हलक्‍या स्वरूपाचं वाटतंय.

त्यात त्यांना अपमान झाल्यासारखा वाटतोय. मग सर स्वतः झाडू हातात घेऊन, फळ्यापुढचा पॅसेज झाडू लागले. काही मुलींना सरांनी झाडून काढलेलं आवडलं नाही. त्या पुढे आल्या आणि म्हणाल्या, “”सर, द्या तो झाडू आम्ही झाडतो.” त्यावर सर म्हणाले, “” राहू दे. मला झाडायची सवय आहे. शिवाय हे एवढंच पुढचं झाडायचंय. म्हणजे कुणाच्या पायाला माती लागायला नको.”

झाडून झाल्यावर सरांनी झाडू कोपऱ्यात ठेवला. क्षणभर विचार केला. समोर बसलेल्या मुलींच्या चेहऱ्यावरून एक नजर फिरवली. आणि म्हणाले, “”आज मी गणित शिकवणार नाही, तर एक गोष्ट सांगणार आहे.”
गोष्ट ऐकायला मिळणार म्हटल्यावर मुलींचे चेहरे खुलले. सर गोष्ट सांगू लागले,

“”असाच एक तुमच्या वर्गासारखा नववीचा मुलींचा वर्ग होता. तो शनिवारचा दिवस होता. त्या वर्गाच्या बाईंनी मुलींसाठी “सुंदर हातांची स्पर्धा’ जाहीर केली. मुली खूश झाल्या. सुंदर दिसणं, नटणं थटणं हा तर त्यांचा आवडीचा विषय. बाई म्हणाल्या, “”आज शनिवार आहे. सोमवारी शाळेत आल्यावर मी तुमचे हात पाहीन. ज्या मुलीचे हात सर्वात सुंदर दिसतील तिला स्नेहसंमेलनात बक्षीस मिळेल.”

मुलींनी टाळ्या वाजवल्या. त्यांना ही स्पर्धा खूप आवडली. घरी गेल्यावर त्यांनी आईशी, मैत्रिणींशी चर्चा केली. हात कसे रंगवायचे, मेंदी कुठून आणायची, ती मेंदी खुलण्यासाठी त्यात काय काय टाकायचे. हातावर कोणती डिझाईन काढायची. नेलपॉलीश कोणते वापरायचे. सारे सारे ठरवण्यात आले. रविवारी रात्री हातांवर मेंदी रेखून, नखे रंगवून सोमवारी मुली शाळेत हजर झाल्या. प्रत्येकीला आपलाच नंबर पहिला येणार याची खात्री होती. मुली नटून थटून, गजरे माळून, कपड्यांवर सेंट फवारून, इस्त्रीचे कपडे घालून आल्या होत्या.

पहिला तास सुरू झाला. कुलकर्णी मॅडमनी हजेरी घेतली. मग मुलींनी त्यांना स्पर्धेची आठवण करून दिली. तर मॅडम म्हणाल्या, “”माझ्या लक्षात आहे.”

नंतर मॅडमनी हातात वही, पेन घेऊन एकेकीचे हात पाहायला सुरुवात केली. त्या हात पाहत होत्या. वहीमध्ये नाव लिहून त्या नावापुढे गुण लिहीत होत्या. कमलचा नंबर आला, तर ती बाईंना हातच दाखवेना. सारखा हात मागे दडवत होती. मग रागानेच बाईंनी तिचा हात हातात घेतला. तर त्या हातावर मेंदी रेखली नव्हती. हात काळा, खडबडीत, राकट वाटत होता. बाई म्हणाल्या, “”काय गं कमल? तू हात नाही रंगवलेस?” त्यावर कमल रडायला लागली. बाईंनी तिला शांत केले. पाठीवरून हात फिरविला. काय झालं ते समजून घेतलं. धीर करून कमल बाईंना म्हणाली, “”बाई गेल्या वर्षी माझे वडील वारले. आम्ही तीन बहिणी. उत्पन्न तोकडं. माझी आई चार घरची धुणंभांडी करते. मग मीही तिला मदत करते. आता तुम्हीच सांगा, दररोज भांडी घासायची म्हटल्यावर हात खडबडीत होणार नाहीतर काय?”

कमलच्या या उत्तरावर बाई विचार करू लागल्या. खरे सुंदर हात कोणाचे? मेंदीने रंगलेले की काबाडकष्ट करून राकट, काळपट झालेले. बाईंनी राहिलेल्या मुलींचेही हात पाहिले. नंतर मुलींना ओरडा केला, “”बाई, निकाल सांगा. पहिला नंबर कुणाचा ते जाहीर करा.”

बाई गंभीर झाल्या. विचार करून म्हणाल्या, “”कमलचा नंबर पहिला आलाय.”

कमलचे नाव ऐकताच मुली म्हणाल्या, “चीटिंग, चीटिंग. तिने मेंदी काढलीच नाही, तर तिचा पहिला नंबर कसा?” त्यावर बाई म्हणाल्या, “”जे हात दुसऱ्यासाठी राबतात, कष्ट करतात, सेवा करतात ते हात सुंदर! आज आपल्या देशाला अशाच हातांची गरज आहे.” बाईंचे म्हणणे मुलींना पटले. त्यांनी टाळ्या वाजवून कमलचे अभिनंदन केले.

तेलीचरी सरांची गोष्ट सांगून झाली. तेवढ्यात तास संपल्याची बेल झाली. खडू, डस्टर घेऊन सर वर्गाबाहेर पडले. तर त्यांच्या पाठोपाठ दोन मुली वर्गाबाहेर आल्या. याच मुलींनी झाडून घ्यायला नकार दिला होता. त्या सरांना म्हणाल्या, “”सर, आम्हाला कळलं, तुम्ही हीच गोष्ट का सांगितली ते. सर, वुई आर सॉरी.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)