चिंतन : विद्यार्थी साधकांसाठी

डॉ. दिलीप गरूड 

पुराणिक सरांचे दैवत होते साने गुरुजी. साने गुरुजींच्या अध्यापनाचा लाभ पुराणिक सरांना मिळाला. त्यांचा मायेचा हात पुराणिक सरांच्या पाठीवरून फिरला. पुराणिक सर अमळनेरच्या शाळेत विद्यार्थी म्हणून अध्ययन करीत असताना प्रत्यक्ष साने गुरुजींच्या मुखातून त्यांना गोष्टी ऐकण्याचा योग आला. साने गुरुजींच्या संस्कारात पुराणिक सरांची जडणघडण झाली.

नंतर महाविद्यालयीन शिक्षण घेऊन पुराणिक सर अध्यापनाच्या क्षेत्रात उतरले. सुरुवातीला त्यांनी अमळनेर, वरणगाव व शिरपूर येथे शिक्षक म्हणून काम केले. नंतर ते पुण्याला आले. एस. एम. जोशी हिंदी माध्यमिक विद्यालयात काम करू लागले. पुणे हीच त्यांची कर्मभूमी झाली. पुढे सरांनी “साने गुरुजी संस्कार साधना’ ही संस्था काढली. ही संस्था शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मुलांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देते.

पुराणिक सरांबद्दल एवढं लिहायचं कारण म्हणजे नुकतंच त्यांचं एक पत्र आमच्या हाती लागलंय. पुराणिक सर त्या पत्रात लिहितात –

“संस्कार साधनेसाठी निश्‍चय’ 
मी स्वतःच्या आणि संस्कारसाधक मित्रांच्या प्रगतीसाठी खाली दिलेले निश्‍चय अंमलात आणणार आहे. हे निश्‍चय साधनेसाठी आहेत म्हणून ते मी मध्येच सोडून देणार नाही. झाड एका दिवसात मोठे होत नाही. म्हणून या निश्‍चयाप्रमाणे वर्तन केल्यावर प्रगती दिसायला वेळ लागेल, हे मी जाणतो. मी प्रगती करीनच. 

 • मी पूर्ण व्यसनमुक्त राहीन. चहा, कॉफी ही सुद्धा व्यसने आहेत हे मी जाणतो.

 • मी माझा अभ्यास सांभाळून आई, वडील यांना मदत करीन. गावातील विधायक कार्यांना यथाशक्ती मदत करीन.

 • सर्व कामे स्वावलंबनाने करीन.

 • वक्तशीरपणा अंगी उतरवीन.

 • कोणत्याही खर्चिक मोहाला बळी पडणार नाही. घरातल्या सर्व प्रकारच्या स्वच्छतेची जबाबदारी मी पूर्ण करीन. उदा. भांडी घासणे, कपडे धुणे, झाडणे, भावंडांना मदत करणे इत्यादी…

 • रेडिओतील आवश्‍यक त्या गोष्टीच ऐकेन. दूरचित्रवाणी ज्ञानाच्या दृष्टिकोनातून अत्यावश्‍यक तेवढीच पाहीन.

 • आम्हा मुलांना मोह पडावा असे भोवतालचे वातावरण आहे. मी या मोहापासून अलिप्त राहीन. मी चंगळवादापासून अलिप्त राहीन.
 • मला खर्चिक व किंमत अधिक असलेल्या वस्तू घेता आल्या नाहीत, तरीही मी दीनवाणा राहणार नाही. 
  वाईट संगतीने आयुष्य नासते. मी संगत, सोबत, पारखूनच मित्र मिळवीन. 
 • विद्यार्थीदशेत येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी कोणते उपाय योजावेत याचा मी वारंवार विचार करीन, उपाय अंमलात आणीन. थोरांचे मार्गदर्शन घेईन, पण खचून जाऊन, धीर सोडून मध्येच ध्येय गाठायचे सोडून देणार नाही. सर्व समाजातील थोरांचा आदर करीन.

 • पाठांतरासाठी काही पद्ये, गीते, गद्य उतारे, सुविचार एका अति छोट्या वहीत उतरवून ठेवीन व ते सर्व वेळ मिळताच पाठ करीत जाईन. त्यात विज्ञानाची, बीजगणिताची सूत्रेही असतील. संस्कृत सुभाषिते तर असतीलच.

 • एका सप्ताहात किमान एक उत्तम पुस्तक वाचेन, पूज्य साने गुरुजींची पुस्तके वाचून, चिंतन, मनन करीन. थोरांची चरित्रे गंभीरपणे वाचीन.

 • दैनंदिन जीवनाचा तक्ता पूर्ण करीन. तक्‍त्यात दिलेल्या सूचना अंमलात आणीन. 
  मी साधक आहे. साधकाने संयम करायचा असतो हे मी जाणतो. जो संयम करीत नाही, तो साधक होऊच शकत नाही.

 • माझ्या साधक मित्रांना वारंवार भेटेन. आपसात प्रगतीचा आढावा घेत जाईन. ठरवलेला वा शाळेतला व्यायाम नियमितपणे करीन. मी ज्ञानार्थी आहे, केवळ परीक्षार्थी नाही. हे सर्व निश्‍चय हळूहळू पूर्ण करीनच.
 • मी स्वतःच्या कामाची दैनंदिनी ठेवीन. मला वाटते विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी वरील नियमावली अत्यंत आवश्‍यक आहे. त्यासाठी पुराणिक सरांना धन्यवाद द्यायला हवेत. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)