चिंतन : देण्याचे तत्वज्ञान

डॉ . दिलीप गरुड

गोष्ट तशी जुनी आहे. 1916 सालातली. त्या वर्षी विनोबा भावे आपले इंटरची परीक्षा न देता, आई-वडिलांना न विचारता सरळ काशी या तीर्थक्षेत्राच्या गावी जाऊन पोहोचले. त्यांना “ब्रह्म’ म्हणजे काय ते जाणून घ्यायचे होते. पुढे ते गांधीजींच्या साबरमती आश्रमात पोहोचले. तेथे ते आश्रमीय जीवन जगू लागले. आश्रमाची नियमावली पाळू लागले. अगदी डोक्‍यावरून मैला वाहून नेण्याचे कामही त्यांनी स्वखुषीने पत्करले. एकदा आश्रमात दीनबंधू ऍण्ड्य्रूज आले होते. विनोबा त्यांच्या कामात मग्न होते. त्यांच्याकडे दुरून बोट दाखवत गांधीजी ऍण्ड्य्रूजना म्हणाले, “”हा विनोबा इथं काही घेण्यासाठी आला नाही, तर देण्यासाठी आलाय.”

गांधीजींनी विनोबांचे मूल्यमापन अगदी यथायोग्य केले होते. मात्र, हे जग दिल्याघेतल्याचे आहे. त्याशिवाय येथील व्यवहार पूर्ण होऊ शकत नाहीत. अगदी एखादा इंजिनिअर त्याचे ज्ञान, कौशल्य आणि वेळ त्याच्या कंपनीला देतो. त्या बदल्यात कंपनी त्याला पगार देते. त्या पगारावर त्याचे कुटुंब चालते. जगाच्या व्यवहारासाठी ही देवघेव योग्यच आहे. त्याशिवाय जगातला कारभार चालणारच नाही. समाजधारणेसाठी आणि समाजस्वास्थ्यासाठी अशी देवघेव आवश्‍यकच असते.

मात्र, काही माणसांना या देवघेवी पलीकडे आणखी काही हवे असते. कुणाला जादा धन हवे असते, कुणाला मान, प्रतिष्ठा, लौकीक हवा असतो. कुणाला कौतुक, पुरस्कार, सन्मानपत्र हवे असते. वर्तमानपत्रात प्रसिद्धी हवी असते. त्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. अशी प्रसिद्धी मिळत नसेल तर त्यांचे स्वास्थ्य बिघडते. चिडचिड वाढते. ते प्रसिद्धीसाठी अगतिक होतात. खरं म्हणजे असली प्रसिद्धी ही अन्नपाण्याइतकी आवश्‍यक गोष्ट नाही, पण काहींना आपली छबी छापून आलेली आवडते. ती छापून यावी म्हणून ते व्यूहरचनाही करतात.

मात्र, गांधी विनोबांसारखी माणसं नोकरी करून अर्थार्जन करण्यासाठी जन्माला आलेली नसतात. ती पैसा मिळविण्याच्या पलीकडे पोहोचलेली असतात. त्यांना स्वतःच्या मालकीचे घरदार नसते. त्यांची बॅंकेत ठेव नसते. आश्रम हेच त्यांचे कुटुंब असते. त्यांना स्वतःसाठी काही मागायचे नसते. समाजाकडून काही घ्यायचे नसते. उलट समाजालाच ते आपली अमूल्य सेवा देत असतात.

जी माणसं समाजाकडून कोणत्याच लाभाची अपेक्षा न करता स्वतःचे संपूर्ण जीवन समाजासाठी खर्च करतात, ती प्रेषितच म्हणायला हवीत. अशी माणसं देवदूत असतात. देवाचा संदेश घेऊन ती येतात, लोकांची सेवा करतात आणि काम पूर्ण होताच आल्यापावली हळूच निघून जातात.

मदर तेरेसा, गौतम बुद्ध, भगवान महावीर, येशू ख्रिस्त, महात्मा गांधी, आचार्य विनोबा, सॉक्रेटिस ही माणसं याच उच्च कोटीतील आहेत. ती काही मिळवायला आलेली नसतात तर, द्यायला आलेली असतात आणि आपल्या कृतीने ती आपल्याला सांगत असतात, की आपणही त्यांच्या कृतीचे आपापल्या परीने अनुकरण करावे. जमेल तशी दीन-दुबळ्यांना, पीडितांना मदत करावी. संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून हाच उपदेश करत असत. ते म्हणत, “”भुकेल्याला अन्न द्या. तहानलेल्याला पाणी द्या. आजाऱ्याची सेवा करा. बापहो, हाच खरा रोकडा धर्म आहे. देव देवळात नाही, तर तो माणसांत आहे.”
किती साधे, सोपे पण मार्मिक तत्त्वज्ञान गाडगेबाबांनी आपल्याला सांगितलंय. त्यांनी सेवेचा धर्म सांगितलाय. देण्याचं तत्त्वज्ञान कवी दत्ता हलसगीकर यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केलंय.
ते लिहितात –

ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे स्वर जुळून आले, त्यांनी दोन गाणी द्यावीत.
सूर्यकुलाशी ज्यांचे नाते, त्यांनी थोडा उजेड द्यावा
युगायुगाचा अंधार जेथे, पहाटेचा गाव न्यावा
ज्यांच्या अंगणी ढग झुकले,
त्यांनी ओंजळ पाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी, रिते करून भरून घ्यावे
आभाळाएवढी ज्यांची उंची,
त्यांनी थोडेसे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले,
त्यांना उचलून वरती घ्यावे
हे घेण्यापेक्षा “देण्याचे’ तत्त्वज्ञान मानवकुलाची उंची वाढविणारे असते. मानवी संस्कृतीच्या उन्नयनासाठी आज त्याचीच गरज आहे आणि आवश्‍यकताही आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)