चिंतन: आपली लोकशाही

डॉ. दिलीप गरूड

लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालविलेली राज्ययंत्रणा म्हणजे लोकशाही अशी एक व्याख्या अब्राहम लिंकन यांनी केली आहे. अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. ते थोर मानवतावादी आणि लोकशाही मानणारे नेते होते. अमेरिकेतील गुलामगिरीची प्रथा त्यांनी नष्ट केली. तसेच या गुलामगिरीच्या प्रश्‍नावरून होणारी देशाची फाळणी त्यांनी टाळली. आज सर्व जगात लोकशाही शासनयंत्रणेचा उदोउदो केला जातो आणि ते खरेही आहे. कोणत्याही सरंजामशाहीपेक्षा; राजेशाही, एकाधिकारशाही किंवा हुकूमशाहीपेक्षा लोकशाही यंत्रणा चांगलीच आहे. तिथे माणसांच्या मताला किंमत दिली जाते.
आपले भारतीय लोक तर मोठ्या फुशारकीने लोकशाहीचे गोडवे गातात. ते गर्वाने म्हणतात, “”भारत हा 135 कोटी लोकसंख्या असलेला जगातला सर्वात मोठा लोकशाहीवादी देश आहे. आमचे संविधान सर्वात श्रेष्ठ आहे. आमची संस्कृती सगळ्या जगात श्रेष्ठ आहे. भारतात अध्यात्म आणि योग याचा प्रथम प्रारंभ झाला. लोकशाही व्यवस्था राबविणारा एवढा मोठा देश जगाच्या पाठीवर दुसरा नाही.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वातंत्र्यानंतर आपण लोकशाही जीवनप्रणाली स्वीकारली. मात्र ती यशस्वी करण्याची जबाबदारीही आपलीच आहे. फक्त लोकशाहीचे गोडवे गाऊन ती यशस्वी होत नाही. तर तसे वर्तन करावे लागते. निवडणुका हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे. मात्र निवडणूक प्रचार आणि मतदान करण्यातील आपले वर्तन दिवसेंदिवस आक्षेपार्ह होत चालले आहे. पण तरीही आपण तसे स्पष्टपणे आणि जाहीरपणे बोलायला तयार नाही. खरं म्हणजे दिवसेंदिवस आपली लोकशाही प्रगल्भ व्हायला हवी होती, पण तसे होताना दिसत नाही.

उमेदवाराच्या बाजूने विचार केला, तर उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षाला निधी द्यावा लागतो. निवडणूक प्रचारासाठी प्रचंड खर्च करावा लागतो. कार्यकर्ते पोसावे लागतात. त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च करावा लागतो. सभेसाठी पैसे देऊन लोक बोलवावे लागतात. आर्थिकदृष्ट्या गरीब माणसाचे हे काम नव्हे. त्याने हा खेळ फक्त दुरुन पाहायचा. ही कसली लोकशाही? इथे संधीची समानता कुठे आहे?

बरेचसे मतदार चार वाजले तरी मतदानाला जात नाहीत. मतदानाला का गेला नाहीस? असा प्रश्‍न विचारला तर म्हणतात, “आम्हाला अजून कुणी बोलावायला आले नाही.”म्हणजे महिना महिना प्रचार करूनही यांना घरी जाऊन बोलावण्याची अपेक्षा. काही मतदार पैशाचे पाकिट हातात पडल्याशिवाय मतदानाला बाहेर पडत नाहीत. हे सर्व उघड गुपित आहे. पण कुणी स्पष्ट बोलत नाही. “तेरी भी चुप, और मेरी भी चुप” असा हा प्रकार आहे. म्हणून निवडणूक प्रक्रियेत सुधारणा व्हायला हवी. सामान्य माणसाला, कर्तबगार माणसाला या निवडणूक प्रक्रियेत खऱ्या अर्थाने भाग घेता आला पाहिजे. हे कुणा व्यक्तिविरोधात किंवा पक्षाविरोधात मत नसून निवडणुकीला लागलेल्या किडीसंदर्भात मतप्रदर्शन आहे. हे वेळीच रोखले नाही, तर आपली लोकशाही खिळखिळी होईल. तिचा फक्त सांगाडाच शिल्लक राहील. त्यातील चैतन्य केव्हाच निघून गेलेले असेल.

घटनेने आपणाला मतदानाचा अमूल्य असा अधिकार दिला आहे. त्या अधिकाराचा आपण वापर केला पाहिजे. मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावले पाहिजे. मतदानाचा दिवस हा सणाचा दिवस असे आपण मानले पाहिजे. राष्ट्राच्या भविष्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी ते अत्यंत आवश्‍यहक आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयी , बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते यांनी संसदेत भाषणे करताना आपणाला लोकशाहीचे महत्त्व पटवून दिले आहे. म्हणून आजच्या या देवघेवीच्या जमान्यात त्यांच्या विचारांचे स्मरण होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकार विरोधात अविश्‍वास ठराव आणला होता. त्या ठरावाला उत्तर देताना ते म्हणाले होते, “”सरकारे आयेगी और जायेगी, पार्टीया बनेगी और बिगडेगी, लेकिन ये देश रहना चाहिये” कारण शेवटी देश महत्त्वाचा आहे. म्हणून म्हणावेसे वाटते, माणसे येतील आणि जातील. नवनवीन पक्ष निर्माण होतील आणि काळाच्या ओघात संपतील. पण येथील लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. ती जिवंत ठेवायची असेल, तर क्षणिक प्रलोभनांपासून आपण दूर राहायला हवे. संविधानाचे फक्‍त गोडवे गाऊन आणि संविधान दिन फक्त, साजरा करून भागायचे नाही, तर प्रत्यक्ष कृतियुक्त आचरण केले पाहिजे. आजच्या काळाची ती मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)