चिंचोली काळदात शाळेची भिंत कोसळली  

कर्जत, (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्‍यातील चिंचोळी काळदात येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत पावसामुळे कोसळली. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्‍न उभा राहिला आहे.

तालुक्‍यात मागील दोन आठवड्यांपासून चांगला पाऊस आहे. संततधार पावसामुळे जुन्या बांधकाम असणाऱ्या सर्वच शाळा आणि महाविद्यालयांना धोका निर्माण झाला आहे. दि. 28 रोजी चिंचोली काळदात येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीचा काही भाग जोरदार पावसामुळे कोसळला. सुदैवाने शाळा सुटल्यानंतर हा प्रकार घडल्याने मोठा अनर्थ टळला, अशी भावना पालकवर्गाने यावेळी व्यक्‍त केली. जिल्हा परिषदेच्या या शाळेत मोठी विद्यार्थी पटसंख्या असून, सदरच्या शाळेची इमारत ही 1970 साली बांधण्यात आलेली आहे. जुन्या बांधकामामुळे शाळेची आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे आहे. अजून दीड ते दोन महिने पावसाळा बाकी असून आपला पाल्य शाळेतून सुरक्षित घरी येईल की नाही? याची चिंता पालकवर्गाला पडत आहे.

गटविकास अधिकारी आणि गटशिक्षण अधिकारी यांनी या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. दि. 28 रोजी नगर तालुक्‍यातील निंबोडी जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा स्लॅब जोरदार पावसामुळे कोसळल्याने 3 विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. ही घटना ताजी असल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे. धोकादायक इमारती असणाऱ्या शाळांची तपासणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात यावी, तसेच या इमारतींवर तातडीने उपाययोजना करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्यात यावीत,अशी मागणी पालकांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)