चिंचोलीत सहा ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ

8 तोळे सोन्यासह 25 हजारांवर डल्ला ; ग्रामस्थ धास्तावले
राहूरी – चिंचोली (ता. राहुरी) येथे एकाच रात्रीत चोरट्यांनी 6 ठिकाणी धुमाकूळ घालत 8 तोळे सोन्यासह 25 हजारावर रोख रक्कम पळवून नेली एका ठिकाणाहून पळून जाताना 1 तोळ्याचा नेकलेस मात्र त्यांच्या हातून पडला तर दवाखान्यातील सीसीटिव्ही कॅमेराही चोरट्यांनी फोडला. 10 दिवसाच्या फरकाने या गावात चोरीचा हा दूसरा प्रयत्न असून राहुरीला नव्यानेच बदलून आलेले पोलीस निरिक्षक शिळीमकर यांना चोरट्यांनी सुरुवातीलाच सलामी दिल्याने पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे तर चिंचोलीत चोरट्यांच्या भितीने ग्रामस्थ धास्तावले आहेत
गुरुवारी पहाटे 2 ते 2-30 असा सुमारे दिड तास चोरट्यांचा थरार सुरू होता. ग्रामस्थांच्या फोन वरील संपर्कामुळे गावच जागे झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. प्रथम नगर-मनमाड राज्य महामार्गालगत असलेल्या डॉ. अनिल लोखंडे यांच्या दवाखान्याच्या पाठीमागील बाजूने तारेच्या कंपाउंडवरून चोरट्यांनी दवाखान्याच्या आवारात प्रवेश केला. त्या बाजूने लावलेला कॅमेरा त्यांनी फोडला. नंतर लोखंडी ग्रीलला असलेले कुलूप कटावणीसारख्या हत्याराने तोडून आतील दरवाजावर प्रहार केला. या आवाजाने डॉ. लोखंडे जागे झाले. त्यांनी आरडाओरडा केल्याने चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. दोन चोरटे दुचाकीवरून आल्याचे डॉ. लोखंडे यांनी सांगितले. त्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही दोनजण दिसले असले तरी फुटेज अस्पष्ट आहे.
यानंतर चोरट्यांनी हरिभाऊ गागरे यांच्या घराकडे मोर्चा वळवत त्यांच्या घराचा दरवाजा तोडून सामानाची उचकापाचक केली. यात त्यांच्या कपाटातील 7 हजार पाचशे रुपये व साडेतीन तोळे सोने चोरट्यांनी पसार केले. नंतर दगडू मारुती काळे यांच्याही घराचा दरवाजा तोडला. मात्र घरातील माणसे जागे झाल्याने चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर रविंद्र इंद्रभान काळे यांचा दरवाजा उघडून आतील कपाट, पेटी, डबे बाहेर नेत उचकापाचक केली. यमध्ये कपड्यात ठेवलेले 600 रुपये त्यांच्या हाती लागले. यानंतर डॉ. संजय पठारे यांच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला मात्र डॉ. पठारे जागे झाल्याने चोरटे येथून पळून गेले. डॉ. पठारे यांनी गावातील बहूतेकांना चोरटे आल्याची माहिती दिल्याने अर्धेअधिक गाव जागे झाल्याने चोरट्यांनी गावातून पोबारा केला. ही माहिती पोलिसांना मिळाल्यावर पहाटे पोलिसही आले मात्र तोपर्यंत चोरट्यांनी पलायन केले. 10 दिवसापुर्वीच येथील आरगडे गागरे वस्तीवर चोरीचा प्रयत्न झाला होता त्याची पुन्हा पुनरावृत्ती झाली आहे. नव्यानेच बदलून आलेले पोलीस निरिक्षक शिळीमकर यांना हे एकप्रकारे चोरट्यांनी आव्हान दिल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे
राहूरी पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. स्थानिक जनतेची साथ घेऊन गस्त वाढविण्यात येणार असून चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावणार असल्याचे पो. नि. शिळीमकर यांनी सांगितले

गुंगीचे औषध फवारल्याची कुजबुज
चोरी झालेल्या सर्व ठिकाणी कुणालाही मारहाण झाली नाही कारण चोरट्यांनी घराबाहेर झोपलेल्या लोकांच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारले असल्याची कुजबुज नागरिकांमधून व्यक्‍त होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1 तोळ्याचे नेकलेस निसटले
उपसरपंच आप्पासाहेब पारखे यांच्या घरी चोरट्यांनी मोर्चा वळवत त्यांचे बंधू बाळासाहेब पारखे यांच्या घरात प्रवेश करुन सामानाची उचका पाचक कली. यमध्ये कपाटातील 6 तोळे सोने व रोख 17 हजार रुपये चोरट्यांच्या हाती लागले. मात्र जाताना यातील 1 तोळ्याचे नेकलेस त्यांच्या हातून पडले. ते सकाळी पारखे यांना घरासमोरील उकीरड्यावर मिळून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)