चिंचोलीत ऊस, पीव्हीसी पाइप, केबल जळाली

राहुरी – तालुक्‍यातील चिंचोली येथे उसाच्या शेतावर लोंबकळणाऱ्या वीजतारांचे घर्षण होऊन तार तुटली. यावेळी पडलेल्या आगीच्या लोळामुळे ऊस, पीव्हीसी पाइप, विद्युत पंपाचे बॉक्‍स, केबल जळाली.

आगीनंतर 12 तासांनी महावितरणचे वायरमन घटनास्थळी पोहोचले. यानंतर तुटलेली विद्युत वाहिनी बाजूला करण्यात आली. महावितरणच्या या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्‍त होत आहे. चिंचोली येथे नगर – मनमाड राज्य महामार्गालगत भाऊसाहेब कचरू ब्राम्हणे यांची शेती आहे. शेतातच ते वास्तव्यास आहेत. बुधवारी सायंकाळी 6 च्या सुमारास ते घरासमोर बसले असताना त्यांच्या उसाच्या शेतावरून गेलेल्या लोंबकळत्या तारांचे घर्षण झाले. एक-दोनदा ठिणग्या पडल्या. तिसऱ्यांदा मोठा आवाज होऊन आगीचा लोळ उसाच्या शेतात पडला. यामुळे उसाला आग लागली. ब्राम्हणे यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना, तसेच महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना बोलावले. परंतु, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.

विखे पाटील कारखान्याच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. नागरिकांनी शेजारचे मका पीक बाजूला केल्याने आगीतून वाचले. जोरदार वाऱ्यामुळे आग पसरत गेली. शेताजवळ जाण्यासाठी रस्ता नसल्याने अग्निशमन यंत्रणाही कुचकामी ठरली. दीड एकर क्षेत्रावरील ऊस, पीव्हीसी पाइप, विद्युत पंपाचे स्टार्टर बॉक्‍स, केबल यात जळाले. त्यांचे साधारण दीड लाखांचे नुकसान झाले. ब्राम्हणे यांच्या शेतावरून गेलेल्या वीजतारा लोंबकळत्या अवस्थेत आहेत. यासंदर्भात त्यांनी कोल्हार येथील उपविभागीय कार्यालयातही वीजवाहिनी दुरुस्त करण्यासाठी वारंवार तक्रारी व पाठपुरावा केला होता. परंतु, त्याबाबत कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती. आग लागलेल्या उसाच्या शेताजवळच मोठी लोकवस्ती आहे. सुदैवाने ही वस्ती आगीपासून वाचली. कामगार तलाठी डोखे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)