चिंचवड बाजारपेठेतील मानाचा गणपती

– श्री संत ज्ञानेश्‍वर मित्र मंडळ

पिंपरी – गांधीपेठेत चिंचवडच्या राजाचा दिमाखदार सोहळा साजरा होत आहे. त्याची भुरळ भक्तांना पडल्याशिवाय राहत नाही. भर बाजारपेठेत बाप्पांची स्वारी विराजमान होत असल्यामुळे व्यापारी, व्यवसायिकांचे हे लाडके बाप्पा मानले जातात. गेल्या 56 वर्षाच्या परंपरेनुसार अत्यंत विलोभनिय, प्रसन्नचित्त, पवित्र वातावरणात भक्तीभावाने उत्सव सोहळा साजरा होत आहे. यावर्षी देखील चिंचवडच्या बाजारपेठेत तोच उत्साह आणि तेच पावित्र्य पहायला मिळत आहे.

चिंचवड गावातील गांधी पेठेत काही प्रतिष्ठीत तरुणांनी एकत्र येऊन गणपती बाप्पांचा उत्सव साजरा करण्यासाठी इ. स. 1962 रोजी श्री संत ज्ञानेश्‍वर मित्र मंडळ स्थापन केले. विविध धर्मातील तरुणांचा एकोपा टिकविण्यासाठी या मंडळाची स्थापना झाली. जुन्या पध्दतीने गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. विसर्जन मिरवणुकीत सणई चौघडा वाद्याच्या तालावर नृत्य सादर करून जुन्या पध्दतीतील तरुणांनी सोहळ्याची भव्य-दिव्यता वाढवली. कालांतराने वाद्य वादनाच्या पध्दतीमध्ये आधुनिक बदल झाले. त्यानुसार नृत्याविष्कार, जिवंत देखावे, ऐतिहासिक प्रात्यक्षिके, युध्दनिती, शस्त्रास्त्र कलेची परंपरा नवीन पिढीला ज्ञान होण्यासाठी या मंडळाने प्रात्यक्षिके सादर केली. अत्यंत दिमाखदार सोहळा वर्षानुवर्षे सादर होत असल्यामुळे या मंडळाच्या गणपतीला चिंचवडचा राजा असे संबोधले जाते, या कार्यामध्ये मंडळाचे सिध्दार्थ शेलार, शुभम ढवळे, श्रेयश सायकर, योगेश मिरजकर आदी सभासदांचे मोलाचे कार्य असते.

चिंचवडच्या गांधीपेठेत म्हणजे मुख्य बाजारपेठेतच भव्य व्यासपीठावर हे लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत. व्यापारी व व्यावसायिकांना या बाप्पांचा लळा लागलेला आहे. प्रत्येक वर्षी व्यापारी वर्गाला गणेशोत्सव म्हटले की या बाप्पांचे वेध लागलेले असतात. पूजेची तयारी आणि व्यापारी वर्गासह भाविकांची हजेरी चिंचवडच्या राजाचा बहुमान दाखवते. हे पावित्र्य व राजाचे मोठेपण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत सतर्कतेने जपले आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी शहरातल्या अनाथ आश्रमातील मुलांना खावू वाटप केला जातो. गरजुंना आर्थिक मदत दिली जाते. सामाजिक प्रबोधन, वृक्षारोपण, गुणवंतांचे कौतुक, ज्येष्ठांचा सत्कार आदी उपक्रम राबविले जातात. महिलांसाठी खेळ पैठणीचा, रांगोळी, पाककला, भोंडला आदी कार्यक्रमही राबविले जातात. मंडळाचे कायदेशीर सल्लागार नगरसदस्य मोरेश्‍वर शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले जाते, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल सायकर यांनी सांगितली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)