चिंचवडमध्ये “नो कन्स्ट्रक्‍शन’

– धरणातील पाणी साठ्याचे कारण की राजकारण?

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील चिंचवड विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्पांची कामे सुरु आहेत. पावसाळा सुरु होऊन देखील पावसाचे प्रमाण सध्या कमी आहे. धरणातील पाणी साठा लक्षात घेता पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, ताथवडे, रावेत, वाकड, पुनावळे, मामुर्डी, किवळे या भागांमधील गृहप्रकल्प बांधण्यास तात्पुरत्या स्वरुपात मनाई करण्यात आली आहे. याबाबतचा ऐनवेळचा प्रस्ताव बुधवारी (दि. 13) झालेल्या स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. एका विधानसभा मतदार संघापुरता हा निर्णय लागू केल्याने यामागे राजकारण असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरात नवीन गृहप्रकल्पांच्या बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील विविध भागांमध्ये नव-नवे गृहप्रकल्प सुरू आहेत. हक्काचे घर आणि गुंतवणूक, अशा दोन उद्देशाने घरे खरेदी केली जात आहेत. वाकड भागात गेल्या सात वर्षांत सर्वाधिक 901 गृहप्रकल्प व अन्य बांधकामांसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्या खालोखाल रहाटणी, काळेवाडी भागात 416 बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. बांधकाम परवानगीतून पालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, ताथवडे, रावेत, वाकड, पुनावळे, मामुर्डी, किवळे इत्यादी भागामध्ये लोकसंख्या वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे गृहप्रकल्प देखील वाढत आहेत. त्यामुळे नव्याने अर्ज दाखल होणाऱ्या गृह प्रकल्पांना काही काळ बांधकाम परवाना देण्यात येणार नाही. पावसाळा सुरु झाला असून पावसाचे प्रमाण सध्या कमी आहे. त्यामुळे होणाऱ्या पावसाचे प्रमाण व धरणातील पाणी साठा विचारात घेऊन त्यानंतर पूर्ववत बांधकाम परवाना देण्यात येईल, असे या प्रस्तावात नमूद केले आहे. या ठरावावर सूचक म्हणून विलास मडिगेरी यांची तर अनुमोदक म्हणून सागर आंगोळकर यांची स्वाक्षरी आहे.


मागील सात वर्षांत बांधकामांना दिलेली परवानगी

वर्ष       दिलेल्या परवानगी
2011- 772
2012- 913
2013- 1157
2014- 1294
2015- 1140
2016 – 1523
2017- 1790

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)