चिंचवडमध्ये गोळीबारात दोन जखमी

  • जखमींकडून नकारात्मक प्रतिसाद

पिंपरी, (प्रतिनिधी) – चिंचवड येथील वाल्हेकरवाडीत शिवाजी चौक येथे सोमवारी मध्यरात्री रस्त्यावर वाहन पार्किंगवरुन झालेल्या एका भांडणात गोळीबार करण्यात आला. गोळीबाराच्या घटनेत दोन जण जखमी झाले. या प्रकरणी जखमींकडून नकारात्मक माहिती मिळत असल्यामुळे चिंचवड पोलिसांनी स्वतःच फिर्यादी होऊन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

जयवंत भगवंत चितळकर (वय 30, रा. तुकारामनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) व निलेश कोळपे अशी गोळीबारात जखमी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा गणपत सागर यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. जखमी जयवंत चितळकर याच्यावर यापूर्वी चार गुन्हे दाखल असून त्याला चिंचवड पोलिसांनी तडिपार केले होते. डिसेंबर 2017 पर्यंत तो तडिपार होता. एका कार चालकाने रस्त्यात लावलेली दुचाकी काढण्यास सांगितल्याने कार चालक आणि जखमींमध्ये वाद झाला. काही वेळाने कार चालक आपल्या काही साथीदारांना घेऊन पुन्हा त्या ठिकाणी आला व चितळकर आणि कोळपे यांना मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तूल किंवा रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. जयवंत चितळकर याच्या डाव्या दंडात गोळी लागली. गुन्हा नोंदविण्यासाठी पोलिसांनी जखमींकडे चौकशी केली असता विसंगत आणि नकारात्मक उत्तरे दिली.

घटनास्थळावर परिमंडळ तीनचे उपायुक्‍त गणेश शिंदे, पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्‍त सतीश पाटील, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनायक साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत महाले, महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा सागर यांनी भेट दिली. चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर. बी. सोडनवार पुढील तपास करीत आहेत.

शहरात गोळीबाराच्या घटना वाढल्या
गेल्या सहा महिन्यांमध्ये शहरात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. सातत्याने काही कालांतराने कुठे ना कुठे तरी गोळीबार होत असल्याने नागरिकांमध्ये देखील भितीचे वातावरण आहे. जून 2017 पासून मार्च 2018 पर्यंत दिघी, सांगवी, भोसरी, पिंपरी आणि चिंचवड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गोळीबाराच्या घटना घडल्या.

गुंडांचे टोळीयुद्ध?
गेल्या एका वर्षात गोळीबाराच्या घटनांमध्ये वेगवेगळ्या टोळ्या असल्याचे दिसून आले आहे. तसेच पोलिसांना टोळ्या नियंत्रित न करता आल्याने शहरातील एकंदरीत वातावरणच भयभीत आहे. वारंवार टोळ्या एकमेकांना भिडत असल्याचे दिसते. काही कुख्यातांचे खूनही झाले, तर काही खुनांचे प्रयत्नही झाले. सराईत आणि टोळींवर नियंत्रण करण्यात पोलीस अपयशी ठरल्याने टोळींचे प्रस्थही वाढत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)