“चास कमान’मध्ये केवळ 17 टक्के पाणीसाठा

पाण्याविना पिके करपली : शेतकरी चिंतातूर

चास कमान- चास कमान धरणातील आवर्तन सध्या बंद आहे. तर यंदा पाऊस कमी झाल्यामुळे आज (रविवार) अखेर धरणात केवळ 17 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने आगामी दोन-तीन महिने कसे जाणार या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.

खेड तालुक्‍यातील काही भागांत सरासरीप्रमाणे तर काही भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मात्र, धरणातील पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने पाणीसाठ्या कमालीची घट झाली आहे. यापुढे शिल्लक असलेले पाणी पिण्यासाठीच उपयोगात आणता येईल. शेतातील पिकांसाठी पाणी मिळणे कठीण आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील पिके पाण्याविना जळू लागली आहे. उन्हाची दाहकता खूपच वाढलेली असल्याने पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होऊन पाण्याची पातळी दिवसेंदीवस कमी होत चालली आहे. आताच आजूबाजूच्या परिसरातील गावांना मार्च मध्येच पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तर पुढे खूप महिने बाकी आहे, यापुढे पाण्याचा प्रश्‍न प्रशासन कसा सोडवेल याची चिंता व्यक्‍त केली जात आहे.

खेड तालुक्‍यात भामा आसखेड, चास कमान आणि कळमोडी ही तीन धरणे आहेत; मात्र तालुक्‍यातील नागरिकांना पिण्याचे पाणी मात्र मिळत नाही. तालुक्‍यातील तीनही धरणांचे पाणी दुसरीकडे जात असल्याने स्थानिक नागरिकांना पिण्यासाठी मिळत नाही. त्यामुळे पाण्यासाठी भविष्यात मोठा संघर्ष निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्‍त करीत आहेत. पावसाळ्यात भरलेली धरणे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापर्यंत 25 ते 30 टक्‍क्‍यांवर येत असल्याने आणि पाण्याचे नियोजन योग्य होत नसल्याने तालुक्‍यावर पाणी टंचाईचे संकट दरवर्षी येत आहे. सत्तेत असलेले नेते मंडळी या पाण्यावर राजकारण करीत आहेत. तर इतर तालुक्‍यातील नेते ते आपल्याला कसे मिळेल, यासाठी वरिष्ठ नेत्यांशी जुळवून घेत धरणातील उपलब्ध पाणी खाली कालव्यांद्वारे आपल्या तालुक्‍यांकडे घेत असल्याने धरणातील पाण्याची पातळी उन्हाळ्यापूर्वी खालावते. एप्रिल, मे महिन्यात नागरिकांना पाण्यासाठी आंदोलनाची वेळ येत आहे. तर पाणी असून ते शेतीला मिळत नसल्याने हातात आलेली पिके जाळून जात असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)