चासकमान धरणात अवघा 7.60टक्के साठा

राजगुरूनगर – खेड तालुक्‍यातील चास कमान धरणात 7. 60 टक्के पाणीसाठा शिल्लक असून राहिलेला पाणी साठा आगामी काळातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आरक्षित करावा, अशी मागणी तालुक्‍यातील नागरिकांनी केली आहे.
चास कमान धरणात आज अखेर 7.60 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. दि. 3 एप्रिल पासून “टेल टू हेड’ या तत्वाने शिरूर तालुक्‍यासाठी पाणी डाव्या कालव्यातून सोडले जात आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी कमी होत चालला आहे. धरणाचे पाणी शिरूर तालुक्‍यासाठी सोडण्यात येत असून खेड तालुक्‍यातील शेतकरी आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

खेड तालुक्‍यात भामा आसखेड, चास कमान आणि कळमोडी ही तीन धरणे आहेत; मात्र तालुक्‍यातील नागरिकांना पिण्याचे पाणी मात्र मिळत नाही. तालुक्‍यातील तीनही धरणांचे पाणी दुसरीकडे जात असल्याने स्थानिक नागरिकांना पिण्यासाठी मिळत नाही. त्यामुळे पाण्यासाठी भविष्यात मोठा संघर्ष निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. पावसाळ्यात भरलेली धरणे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापर्यंत 25 ते 30 टक्‍क्‍यांवर येत असल्याने आणि पाण्याचे नियोजन योग्य होत नसल्याने तालुक्‍यावर पाणी टंचाईचे संकट दरवर्षी येत आहे. सत्तेत असलेले नेते मंडळी या पाण्यावर राजकारण करीत आहेत. तर इतर तालुक्‍यातील नेते ते आपल्याला कसे मिळेल, यासाठी वरिष्ठ नेत्यांशी जुळवून घेत धरणातील उपलब्ध पाणी खाली कालव्यांद्वारे सोडण्यात येत असल्याने धरणातील पाण्याची पातळी उन्हाळ्यापूर्वी खालावते. एप्रिल, मे महिन्यात नागरिकांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. पाणी असून ते शेतीला मिळत नसल्याने हातात आलेली पिके जाळून जात आहेत.

..तरीही आवर्तन सुरूच

चास कमान धरणात केवळ 7. 60 टक्के इतकाच पाणीसाठा राहिल्याने आणि धरणातून डाव्या कालव्यात 550 क्‍युसेक्‍स वेगाने पाणी सोडण्यात येत असल्याने धरणातील उपलब्ध जलसाठ्यावर विपरीत परिणाम होत असून हा साठा झपाट्याने कमी होत आहे. अजूनही काही दिवस धरणातून डाव्या कालव्यात शेतकऱ्यांना पाणी सोडणे सुरु राहणार असल्याने धरणात पाणी शिल्लक राहील का नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. उपलब्ध पाणीसाठा आगामी काळात टंचाईचा सामना करण्यासाठी आरक्षित करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.
चास कमान ःधरणात अवघा 7.60 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)