चालकाला लुटणाऱ्या दोन दरोडेखोरांना पोलीस कोठडी

वडगाव मावळ – विश्रांतीसाठी कंटेनरखाली झोपलेल्या चालकास दोन दरोडेखोरांनी मारहाणीची धमकी देत 23 हजार 500 रुपयांची रोख लुटली. साते (ता.मावळ) हद्दीत गुरुनानक ढाब्याजवळ सोमवारी (दि. 6) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. कंटेनर चालकाच्या तक्रारीवरून दोन तासांतच दोन दरोडेखोरांना वडगाव पोलिसांनी अटक करून मुद्देमाल वसूल केला. या दरोडेखोरांकडून आणखी गुन्हे उघडीस होण्याची शक्‍यता पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी व्यक्‍त केली. दरोडेखोरांना वडगाव मावळ न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली.

अजय सुरकास पवार (वय 20) व अमोल भागवत शिंदे (वय 19) दोघे (रा. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.

-Ads-

सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हनुमंत परमेश्‍वर शिरसाठ (वय 29, रा. बीड) हे त्यांच्या ताब्यातील कंटेनर (एम. एच. 23 /डब्ल्यू/3237) साते (ता. मावळ) हद्दीत गुरुनानक ढाब्याजवळ उभा करून विश्रांतीसाठी झोपले होते. त्यावेळी दरोडेखोर अजय पवार व अमोल शिंदे यांनी मारहाणीची धमकी देऊन चालक शिरसाठ यांच्याजवळची रोख 23 हजार 500 रुपये जबरदस्तीने लुटले. तसेच अंधाराचा फायदा घेत दोघे पसार झाले. शिरसाठ यांनी त्वरित वडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने वडगाव येथील ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना, या दरोडेखोरांना अटक केली. त्यांच्याकडून रोख 23 हजार 100 रुपये मुद्देमाल वसूल केला. मंगळवार (दि. 7) दुपारी वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी या गुन्ह्यांचा अधिक तपास करण्यासाठी या दरोडेखोरांना गुरुवारपर्यंत (दि. 9) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)