चार पदार्थांची स्थापना करणारा चतुर्भुज !!! (गणेश नाममाहात्म्य)

चार हात असणारा तो चतुर्भुज. सामान्य जीवांपेक्षा अधिक क्षमता, शक्ती असणारा. पाशांकुश व परशू धारण करणारे दोन हात दुष्टनिर्दालन करणारे, तर मोदक व वरदहस्त सज्जनांना संतोष देणारे. द्वापार युगात भगवंतांनी गजाननावतार धारण केला तेव्हा गणेश चतुर्भुज होता. चार पदार्थांची स्थापना करणारा… म्हणजे स्वर्गामध्ये देवांनी राहावे, मृत्युलोकात मनुष्यांनी राहावे व पाताळात दैत्यादिकांनी राहावे, अशी मर्यादा ठरविणारा. अर्थात, त्यांचा स्थापक आणि या मर्यादेप्रमाणे वागणारांचे रक्षण करून विरुद्ध वागणारांना शिक्षा करणारा, अशा अर्थी समग्र विश्‍वाधार अशा तत्त्वाची स्थितिस्थापना करणारा म्हणून चतुर्विधत्व स्थापक अशी विशेष सत्ता प्रकाशित करणारा एक अवतार.

दैत्यांची माता जी दिती, तिने तपोबलाने प्रसन्न करून घेऊन वरदान मागितल्यावरून श्रीगणराजप्रभूंनी तिच्या घरी अवतार धारण केला. तोच “चतुर्भुज’ नामक गणेशाचा अवतार!

एकदा विष्णु आदी देवांनी दैत्यांना जिंकले. विश्‍वातील समस्त दैत्यांचा नाश करावयाचा या निश्‍चयाने देवांनी त्यांचा संहार चालू केला. तेव्हा ती सर्व दैत्यमंडळी दितीला शरण गेली. दिती अत्यंत दुःखी झाली. विश्‍वमर्यादेचा भंग व दितीची दुःखाकुलता यांमुळे तिचा पुत्र प्रभु चतुर्भुज गणेश क्रुद्ध झाला. त्याने देवांच्या नाशासाठी आपला परशू सोडून दिला. त्या दिव्य शस्त्राच्या अमोघ तेजामुळे समस्त देव अगदी होरपळून गेले, तेव्हा सर्व देव चतुर्भुजास शरण आले व नानाप्रकारे स्तवन करून क्षमा मागू लागले. तेव्हा परशू शांत झाला. गणेश प्रसन्न झाले. सर्वांना आपापल्या स्थानी राहून, आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याची मर्यादा ठरवून देणारा हा “चतुर्भुज’ अवतार.

– दीपक कांबळे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)