चार नगरसेवकांचे भवितव्य राज्य शासनाच्या हातात!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत आरक्षित जागेवरून निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने भाजपच्या चार नगरसेवकांची माहिती महापालिकेने राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडे पाठवली आहे. त्यामुळे चार नगरसेवकांचे भवितव्य आता राज्य सरकारच्या हाती आहे. राज्य सरकार जे निर्देश देईल, त्यानुसार नगरसेवक पद रद्द करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्‍त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी सांगितले.

निवडणुकीनंतर सहा महिन्यांत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते; परंतु त्यांनी ते सादर केले नव्हते. महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार कुंदन गायकवाड हे चिखली प्रभाग क्रमांक एक-अ या राखीव जागेवरून निवडून आले आहेत. तर, भोसरी धावडेवस्ती, भगतवस्ती प्रभाग क्रमांक सहा एक-अ या राखीव जागेवरून निवडून आलेल्या नगरसेविका यशोदा बोईनवाड या दोन्ही नगरसेवकांनी दीड वर्ष होत आले तरी जात प्रमाणपत्र सादर केले नाही.

त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 23 एक – अ शिवतीर्थनगर, समर्थनगर, केशवनगर प्रभागातून निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका मनीषा पवार आणि प्रभाग क्रमांक 13 निगडी गावठाण, यमुनाननगर एक – अ मधून आरक्षित जागेवरुन निवडून आलेल्या कमल घोलप यांनी जात प्रमाणपत्र सहा महिन्याची मुदत संपल्यानंतरही सादर केले आहे. त्यामुळे आता या चार नगरसेवकांचे भवितव्य राज्य सरकारच्या हातात आहे. कोल्हापूर महापालिकेत आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या नगरसेवकांनी सहा महिन्याच्या मुदतीमध्ये जात प्रमाणपत्र सादर केले नव्हते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने 19 नगरसेवकांचे पद रद्द केले आहे. त्या पार्श्वभूमीवर विहीत मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या नगरसेवकांची माहिती सरकारने मागवून घेतली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चार नगरसेवकांनी विहित मुदतीत प्रमाणपत्र सादर केले नसून अद्यापही दोन नगरसेवकांचे प्रमाणपत्र आले नाही. याबाबतची माहिती राज्य सरकारकडे यापूर्वीच पाठविण्यात आली होती. तसेच आठवण पत्र देखील पाठविले असून नियम पाच (ब) नुसार कारवाई करावी, अशी शिफारस केली आहे.
– डॉ. प्रवीण आष्टीकर, सहाय्यक आयुक्‍त, निवडणूक विभाग.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)