चार तासांच्या आंदोलनामुळे लक्षावधी प्रवाशांचे हाल

बेकार तरूणांनी रोखली मुंबईची रेल्वे वाहतूक


रेल्वे भरती त्वरीत सुरू करण्याची मागणी

मुंबई – गेली चार वर्ष बंद असलेली रेल्वे भरती त्वरीत सुरू करा या मुख्य मागणीसाठी शेकडो बेकार युवकांनी आज मुंबईच्या उपनगरीय रेल्वे वाहतुकीसह लांबपल्ल्याच्या गाड्यांची वाहतूकही वेठीस धरली. सुमारे चार तास झालेल्या या आंदोलनामुळे लक्षावधी रेल्वे प्रवाशांना फटका बसला. दादर ते माटुंगा या दोन महत्वाच्या स्थानकादरम्यान त्यांनी हे अचानक रेल रोको आंदोलन केले. यातील बहुतांशी युवक रेल्वेत ऍप्रेंन्टीसशिप केलेले युवक आहेत पण रेल्वेन त्यांना नोकरीत घेतलेले नाही. चार वर्षांपासून रेल्वेची भरतीच बंद करण्यात आली आहे असा त्यांचा आरोप आहे.

या आंदोलनामुळे मध्यरेल्वेला उपनगरीय तसेच लांबपल्ल्याच्या गाड्या थांबवून ठेवाव्या लागल्या. आंदोलकांनी चारही महत्वाचे मार्ग रोखून धरले होते. पोलिसी बळाचा वापर करून त्यांना तेथून हुसकाऊन लावण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यांनी त्याला दाद दिली नाही. रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी आमच्याशी चर्चा केल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. तिकडे अनेक स्थानकांवर उपनगरीय रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने त्यांच्यामध्येही अस्वस्थता निर्माण झाली होती.

शेवटी या आंदोलकांना चार तासांच्या प्रयत्नांनंतर तेथून हटवण्यात आल्यानंतर ही वाहतुक पुर्ववत झाली. रेल्वे स्थानकांवर खोळंबून राहिलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी बेस्टने नंतर जादा बसेस सोडल्या होत्या. कुर्ला, घाटकोपर, मुलूंड स्थानकापासून मोठ्या प्रमाणात जादाच्या बेस्ट बसेस सोडण्यात आल्या.

आंदोलकांपैकी अनेक जण रेल्वेची ऍप्रेन्टीस परिक्षा उत्तीर्ण झाले होते. परंतु तरीही त्यांना रेल्वेत पुर्णवेळ नोकरीत सामाऊन घेण्यात आले नव्हते. रेल्वे भरतीतील जनरल मॅनेजरचा 20 टक्के कोटा रद्द करा आणि तेथेही आम्हाला संधी द्या अशी त्यांची मागणी होती. दरम्यान या युवकांना सामाऊन घेण्यासाठी प्रवेश परिक्षा लवकर घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन यांनी सांगितले की 31 मार्च पर्यंत अर्ज मागवून घेऊन ही परिक्षा घेतली जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)