चारा छावण्या सुरू न झाल्यास 19 पासून जिल्हाभरात रास्तारोको

शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; छावणीसाठीच्या जाचक अटी शिथिल करण्याची मागणी

नगर: दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून राज्य सरकारने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याबाबत दि. 25 जानेवारी रोजी अध्यादेश काढला. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यातून चारा छावण्या सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. परंतु, प्रशासनाकडून अद्याप एकाही गावात चारा छावणी सुरू करण्यात आलेली नाही. याशिवाय तुटपुंजे अनुदान, जाचक अटी शर्तींमुळे छावण्या चालवणे कठीण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने जाचक अटी शिथिल करून तात्काळ जिल्ह्यात चारा छावण्या सुरू कराव्यात अन्यथा दि. 19 फेब्रुवारीपासून जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

शिवसेना उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, घनश्‍याम शेलार आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शनिवारी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांची भेट घेवून चारा छावण्या मंजुरीबाबत चर्चा करून निवेदन दिले. यावेळी जि.प.सदस्य संदेश कार्ले, अनिल कराळे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, गिरीश जाधव, राजेंद्र भगत, माऊली शिंदे, रावजी नांगरे, मोहन भिंताडे, संजय आनंदकर, शहाजी राळेभात, शिवाजी कराळे, नाथ वाढेकर आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात प्रचंड दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पाण्याचा, चाऱ्याचा व पशुधन वाचवण्याचा मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. राज्य सरकारने 25 जानेवारी रोजी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याचा अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार अनेक तालुक्‍यातून प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे. त्याला अद्याप प्रशासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. शासन नियमाप्रमाणे एका शेतकऱ्याचे फक्त पाच जनावरे छावणीत घेण्याची अट आहे. हि अट अतिशय चुकीची असून शेतकऱ्यांकडील सर्व लहान मोठे जनावरे छावणी सामिल करून घ्यावेत. छावणीतील जनावरांना शासनाव्दारे पाणीपुरवठा करण्यात यावा, जनावरांसाठी देण्यात येणारे अनुदानही अतिशय तुटपुंजे आहे. मोठ्या जनावरांसाठी 70 रुपयाऐवजी 100 रुपये व छोट्या जनावरांसाठी 30 रुपये ऐवजी 50 रुपये अनुदान देण्यात यावे. चाऱ्याचे भाव सध्या प्रचंड वाढले आहेत, त्यामुळे अनुदानात वाढ करणे गरजेचे आहे. चारा छावणी संस्थांसाठी ऑडिट रिपोर्ट, आयकर रिर्टन अशा जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. या अटीही शिथिल कराव्यात. आवश्‍यक बदल करून प्रशासनाने तात्काळ चारा छावण्या सुरू केल्या नाही तर मंगळवार दि.19 फेब्रुवारीपासून जिल्हाभर शिवसेनेच्यावतीने रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

मंगळवार दि.19 फेब्रुवारी रोजी पाथर्डी, दि. 20 रोजी श्रीगोंदा, दि. 21 रोजी नगर, दि. 22 रोजी पारनेर, दि. 23 रोजी जामखेड, दि. 24 रोजी कर्जत आणि दि. 25 रोजी शेवगाव तालुक्‍यात रास्ता रोको करण्याचे नियोजन शिवसेनेने केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)