चाफळ ग्रामपंचायतीसाठी 83.64 टक्के मतदान

चाफळ : मतदानासाठी मतदान केंद्रावर झालेली गर्दी.

सरपंचपदाचा आज फैसला

चाफळ, दि. 24 (वार्ताहर) – अतीसंवेदशील समजल्या जाणार्‍या तीर्थक्षेत्र चाफळ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी एकूण तीन वार्डातून सुमारे 83.64 टक्के मतदान झाले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचासह नऊ सदस्यांचे भवितव्य रविवारी मतपेटीत बंद झाले आहे.
दरम्यान, आज (सोमवारी) पाटण येथे सकाळी दहा वाजता मतमोजणी होत आहे. तासाभरात या निवडणुकीचा निकाल जाहिर होणार असून चाफळच्या पहिल्या लोकनियुक्त सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे स्पष्ट होणार असून या निकालाकडे सर्वाच्याच नजरा लागून राहिल्या आहेत.
या निवडणुकीसाठी पाटणकर व आ. देसाई या गटाकडून सरपंचपदासह एकूण दहा जागेसाठी 20 उमेदवार निवडणुक रिंगणात एकमेकांसमोर उभे राहिल्याने याठिकाणी दुरंगी सामना रंगला होता. प्रचारादरम्यान, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपासह काहींकडून अगदी खालच्या पातळीवर जावूनही प्रचार करण्यात आल्याचे दिसून आले. सद्यस्थितीत चाफळ ग्रामपंचायतीवर आ. शंभूराज देसाई यांची सत्ता आहे. सरपंचपद हे लोकनियुक्त असल्यामुळे चाफळचा पहिला लोकनियुक्त सरपंच होण्यासाठी दोन्ही गटाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या निवडणुकीत रविवारी झालेल्या एकूण 2 हजार 715 मतांपैकी 2 हजार 271 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. वार्डनिहाय झालेले मतदान व कंसात टक्केवारी पुढीलप्रमाणे श्रीराम वार्ड क्र. 1 मधून पुरुष 396, स्त्रीया 373 एकूण 966 पैकी 769 (79 टक्के), महादेव वार्ड क्र. 2 मधून पुरुष 415, स्त्रीया 397 एकूण 926 पैकी 812 (88 टक्के), नांदलार्ईदेवी वार्ड क्र. 3 मधून पुरुष 345, स्त्रीया 345 एकूण 823 पैकी 690 (83.83 टक्के) असे एकूण मतदान झाले आहे. निवडणुक काळात उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

चौकट

काही कार्यकर्त्यांकडून अंधश्रध्देला खतपाणी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन्ही गटाकडून प्रचार यंत्रणा जोमात सुरु होती. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी रात्रीचे सुमारास काही कार्यकर्त्यांकडून गावातील चौकाचौकात हळद-कुंकू, अबीर लावलेली लिंबे ठेवण्यात आल्याने वातावरण चांगलेच तापले होते. अशा अघोरी व अंधश्रध्देला खतपाणी घालणार्‍या प्रकारामुळे मतदारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या प्रकाराची चर्चा रविवारी दिवसभर गावात सुरु होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)