चापेकर चौकात चौदा कोटींचा पादचारी भुयारी मार्ग

पिंपरी – शाळा, बॅंक, शासकीय व निमशासकीय कार्यालये, तीर्थस्थळ यामुळे पादचाऱ्यांची कायम वर्दळ असणाऱ्या चापेकर चौकात वैशिष्ट्यपूर्ण पादचारी भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. या चौकाला जोडणाऱ्या पाचही रस्त्यांना ये-जा करण्यासाठी प्रवेशद्वार करण्यात येणार असल्याने शहरातील हा पहिलाच अशा प्रकारचा पादचारी मार्ग ठरणार आहे. मार्गात 25 गाळे दुकानांसाठी महापालिका उपलब्ध करुन देणार असल्याने याठिकाणी छोटेखानी बाजारपेठ वसणार आहे. यासाठी सुमारे चौदा कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

चिंचवडमधील चापेकर चौक हा शहरातील मुख्य चौकांपैकी एक आहे. क्रांतीवीर चापेकर स्मारक, महासाधू मोरया गोसावी मंदिर तसेच शाळा, पोलीस स्टेशन, बॅंक, शासकीय व निमशासकीय कार्यालये या भागात असल्याने याठिकाणी पादचाऱ्यांचा मोठ्‌या प्रमाणावर राबता असतो. चिंचवडगाव, थेरगाव, लिंकरोड, दळवीनगर, चिंचवड स्टेशनला हा चौक जोडतो. त्यातच विक्रेत्यांचे अतिक्रमण, रिक्षा थांबा, बस थांबा यामुळे उड्डाणपूल उभारुनही याठिकाणचा वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निकालात निघाला नाही. या चौकातून पादचाऱ्यांना जीव मुठीत धरुन वावरावे लागते. या पार्श्‍वभूमीवर या चौकात पादचारी भुयारी मार्गाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. अखेर त्याला पुर्ण विराम मिळाला आहे.

महापालिकेने याठिकाणी पादचारी भुयारी मार्ग उभारण्यासाठी नुकतीच निविदा प्रसिद्ध केली आहे. जमिनीच्या खाली वर्तुळाकार स्वरुपाचा हा मार्ग पाचही रस्त्यांना जोडला जाणार आहे. शहरातील सध्याचे भुयारी मार्ग केवळ दोन दिशेला जोडले गेले आहेत. त्यामुळे हा मार्ग वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. 25 गाळे मार्गात बांधले जाणार आहेत. 262.50 चौरस मीटर जागेत हे गाळे तयार करण्याचे प्रस्तावित आहे. फेरीवाले तसेच इतर विक्रेत्यांना हे गाळे नाममात्र दराने दिले जाणार आहेत. त्यामुळे त्यातून महापालिकेला उत्पन्न मिळेल. तसेच चौकातील अतिक्रमणे हटविण्यास मदत होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

सुमारे 2 हजार 282 चौरस मीटर जागेतील या भुयारी मार्गात हवा खेळती रहावी यासाठी वरील बाजूस तीन खुले डोम तयार करण्यात येणार आहेत. पंधरा फुट उंचीचा हा मार्ग असणार आहे. सीसीटिव्ही कॅमेरे, ट्रॅफीक वॉर्डन, सफाई कर्मचारी याठिकाणी तैनात केले जाणार आहेत. आग प्रतिरोधक यंत्रणा, आपत्कालीन परिस्थितीमध्ये सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा, पिण्यासाठी थंड पाण्याची सोय आदी सुविधा याठिकाणी असणार आहेत. भुयारी मार्गातील भिंती आकर्षक पद्धतीने तयार केल्या जाणार आहेत. या कामावर सुमारे चौदा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी महापालिकेने नुकतीच निविदा प्रसिद्ध केली होती. महिनाभरात कामाचे आदेश काढले जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)