“चाणक्‍य’ अहवालाची खासदार, आमदारांना धास्ती

खा. गांधीची उमेदवारी धोक्‍यात; राजळे वगळता चार आमदार असुरक्षित?

नगर – चाणक्‍य अहवालाबाबत भाजपचे नेतेच संदिग्ध विधाने करीत असल्याने या अहवालाविषयीचे औत्सुक्‍य आणखीच वाढले आहे. पराभूत होणाऱ्यांत आपला, तर समावेश नाही ना, या चिंतेने नगर जिल्ह्यातील खासदार दिलीप गांधी व चार आमदारांना ग्रासले आहे. चाणक्‍यच्या अहवालाचा आधार घेत पक्षश्रेष्ठी आपला पत्ता तर कट करणार नाही ना, याची धास्ती खासदार व आमदारांना लागली आहे.
नवी दिल्ली येथील चाणक्‍य नावाची संस्था भाजपसाठी वारंवार सर्वेक्षण करीत असते. तिचे अहवाल अतिशय गोपनीय असतात. चाणक्‍य ही भाजपशी संबंधित संस्था आहे. तिचे अहवाल बऱ्याचदा खरे ठरले आहेत. आताही या चाचणीच्या अहवालाच्या आधारे भाजपच्या आठ खासदारांना व 40 आमदारांना पुन्हा निवडून येणे अवघड दिसते. मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना तशी जाणीव करून दिल्याचे वृत्त पसरले. त्यामुळे भाजपच्या खासदार, आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. उघडपणे आपला असुरक्षित आमदार, खासदारांत समावेश आहे, असे मान्य करायला कुणी तयार नाही. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी चाणक्‍यच्या अहवालाबाबतचे वृत्त फेटाळले असले, तरी प्रदेशाध्यक्ष, खा. रावसाहेब दानवे यांनी मात्र पक्षाकडून अशा प्रकारचे सर्वेक्षण अधूनमधून होत असल्याचे मान्य केले आहे. भाजपच्या नेत्या-कार्यकर्त्यांत आपल्याच पक्षाचे नेते परस्परविरोधी वक्तव्ये करीत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
नगर जिल्ह्यात खा. दिलीप गांधी यांनी लोकसभेची उमेदवारी मिळेल, असे गृहीत धरून प्रचाराचा प्रारंभ सुरू केला आहे; परंतु चाणक्‍यच्या अहवालानुसार खा. गांधी यांनाही निवडणूक सोपी नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे त्यांना लोकसभेऐवजी विधानसभेच्या निवडणुकीत उतरविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कदाचित त्यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांना पक्ष नगर विधानसभेची उमेदवारी देईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. नगर लोकसभेची जागा हातून जाऊ द्यायची नसेल, तर उमेदवार बदलण्याचा पर्याय पक्षाने ठेवला असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्याचे संपर्कमंत्री प्रा. राम शिंदे यांचे नाव त्यादृष्टीने आघाडीवर आहे. या मतदारसंघातील इतर मागासवर्गीय मतदारांची संख्या लक्षात घेता आणि मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले उमेदवार म्हणून प्रा. शिंदे यांचे नाव पुढे केले जात आहे. प्रा. शिंदे यांच्या स्वतः च्या कर्जत-जामखेड मतदारसंघात त्यांच्याविरोधात वाढत असलेली नाराजी आणि भाजपच्या काही नेत्यांनीच त्यांच्याविरोधात लढण्याची केलेली तयारी पाहता त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्‍यता दिसते. त्यांची स्वतः ची मात्र राज्याच्या राजकारणात राहण्याची इच्छा आहे. प्रा. शिंदे यांनी फारच अनिच्छा व्यक्त केली, तर मात्र भाजपचे नगर जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांचे नाव निश्‍चित केले जाण्याची शक्‍यता आहे.
पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघातील आ. मोनिका राजळे या दुःखातून सावरल्या आहेत. त्यांनी मतदारसंघात जम बसविला आहे. चाणक्‍यच्या पाहणी अहवालात त्या पुन्हा निवडून येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याचे सांगितले जाते. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांची त्यांना होणारी मदत आणि या मतदारसंघातील जातीय समीकरणे लक्षात घेता त्यांच्या ती फायद्याची आहेत. अर्थात या मतदारसंघातही खा. गांधी यांच्या गटाने राजळे यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. राजळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी चंद्रशेखर घुले यांना मिळण्याबाबत आता कोणतीही अडचण नाही; परंतु राष्ट्रवादीतही एकवाक्‍यता नाही. शिवाजीराव कर्डिले यापूर्वी वेगवेगळ्या चिन्हावर निवडून येत आहेत. त्यांनी डॉ. सुजय विखे या कॉंग्रेसच्या उमेदवाराचा वारंवार केलेला पुरस्कार आणि विखे गटाची त्यांना उघड होत असलेली मदत यावरून त्यांच्या पक्षनिष्ठेविषयी वारंवार शंका घेतल्या जात आहेत. त्यांच्याबाबतीतही चाणक्‍यचा अहवाल प्रतिकूल असल्याचे सांगितले जाते.
नेवासे मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी जास्त सुरक्षित मानला जात होता;परंतु आमदार असताना मतदारांशी कधीही संपर्क न ठेवलेल्या, मोबाईलवर कधीच उपलब्ध नसलेल्या आणि गाडीच्या काचा कधीच खाली न करणाऱ्या शंकरराव गडाख यांना मतदारांनी धडा शिकविला. मोदी लाटेत बाळासाहेब मुरकुटे यांची लॉटरी लागली; परंतु गेल्या चार वर्षांत मुरकुटे यांचे कामही फारसे समाधानकारक नाही. त्यांच्याविषयीचा रोष वारंवार व्यक्त व्हायला लागला आहे. आमदारांचे स्वकीय तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी जी घोषणा झाली, ती उद्वेगातूनच. या पार्श्‍वभूमीवर चाणक्‍यच्या अहवालात त्यांचे ही नाव असल्याचे सांगितले जाते. एक दशकानंतर कोपरगावात पुन्हा कोल्हे घराण्याला आमदारकी मिळाली. स्नेहलता कोल्हे आमदार झाल्या; परंतु त्यानंतरच्या पाच वर्षांत झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत कोपरगाव तालुक्‍यातील जनतेने भाजपला धडा शिकविला. नगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजपला पराभव पत्करावा लागला. शंकरराव कोल्हे यांचे कर्तृत्त्व होते. त्यांचे चिडणेही लोक समजून घ्यायचे. त्यांनी बेरजेचे राजकारण केले. तसे राजकारण स्नेहलता कोल्हे करतात का, हा संशोधनाचा मुद्दा आहे. अशोक काळे आणि आशुतोष काळे यांच्या राजकारणात कमालीचा फरक आहे. आशुतोष यांनी सातत्याने मतदारसंघात संपर्क सुरू ठेवला आहे. चाणक्‍यच्या अहवालात कोपरगावबाबतही प्रतिकूल शेरा असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे भाजपला लोकसभा व विधानसभेच्या चार जागा टिकविण्याचे मोठे आव्हान आहे.

-Ads-

दोन्ही कॉंग्रेसचे लक्ष
भाजपला मिळालेले यश हे राष्ट्रवादीच्या जागा जिंकून मिळालेले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करताना या जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून येतात कसे, असा सवाल कार्यकर्त्यांना विचारला होता. दोन्ही कॉंग्रेसने आता भाजपच्याच मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)