चाकण पोलीस ठाण्यात उपनिरीक्षकास बेदम मारहाण

दोघा भावांना अटक : वडिलांवर कारवाई केल्याच्या रागातून घडली घटना

चाकण – वडिलांना पोलीस ठाण्यात आणल्याचा रागातून सख्या दोन भावांनी पोलीस ठाण्यातच पोलीस उपनिरीक्षकास बेदम मारहाण करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. हा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. 23) रात्री दहा वाजता चाकण पोलीस ठाण्यात घडला असून पोलिसांनी दोघा भावांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

कल्लू नागेंद्र डुबे (वय 25) व सोनू नागेंद्र डुबे (21, दोघे रा. पिंपरी) या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद रामकृष्ण कठोरे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, महाळुंगे येथे ज्वलाग्रही ऑईल घेऊन जाणारा टेम्पो चाकण पोलिसांनी इशारा करून थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र, भरधाव वेगात चालवून वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून व ज्वालाग्रही ऑईलची वाहतूक करतना कोणतेही सुरक्षेचे उपाय न योजता हयगयीने हाताळणी करत, लोकांचे जीवितास धोका होईल अशा पद्धतीने वाहतूक करीत असतना पाठलाग करून पकडले ही घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.

यावेळी टेम्पो चालक संतून रामेश्‍वर भोसले आणि नागेंद्रा जयनारायण डुबे या दोघांना ताब्यात घेतले म्हणून कल्लू व सोनू या दोघांनी रात्री अकरा वाजत चाकण पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रामकृष्ण कठोरे यांना, तुम्ही आमच्या वडीलांना पोलीस ठाण्यात का आणले तुला माहित आहे का मी कोण आहे असे म्हणत मारहाण, दमदाटी ,शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा आणला, असे फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)