चाकण तोडफोड, जाळपोळ प्रकरणात 15 जणांना पोलीस कोठडी

पुणे- सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या खेड तालुका बंद दरम्यान 30 जुलै रोजी चाकण परिसरात झालेल्या जाळपोळ आणि हिंसाचार प्रकरणात अटक केलेल्या 15 जणांना आठ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी सत्यशीला कटारे यांनी दिला.
पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे मोठ्या प्रमाणात वाहनाची तोडफोड आणि जाळपोळ केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चाकण पोलिसांनी 18 जणांना अटक केली आहे. यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर, 15 जणांना गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टहॉल बाहेर पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मनोज दौलत गिरी (वय-23,रा.खेड,पुणे), सूर्यकांत बाळू भोसले (21,रा.खेड), परमेश्वर राजेभाऊ शिंदे(22,मु.रा.बीड), अभिषेक विनोद शाह(19,रा.खेड), विशाल रमेश राक्षे(26,रा.खेड), सत्यम दत्तात्रय कड (19,रा.खेड), समीर विलास कड(20,रा.खेड), रोहिदास काळूराम धनवटे (19,रा.खेड), विकास अंकुश नाईकवाडे (28रा.खेड), सोहेल रफिक इनामदार (19,रा.खेड), प्रवीण उद्धव गावडे(23,रा.खेड), आकाश मारुती कड (25,रा.खेड), सचिन दिगंबर आमटे (27,मु.रा.बीड), आनंद दिनेश मांदळे (18,रा.खेड), प्रसाद राजाराम खंडेभराड (18,रा.खेड) यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चाकण येथे झालेल्या जाळपोळ आणि हिंसाचार प्रकरणात अटक आरोपींवर भारतीय दंड विधान कायदा कलम 353, 341,435, 326,332, 333, 324, 323, 143, 145, 147, 148, 149 सह महामार्ग ऍक्‍ट 8 ( ब), नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ऍक्‍ट 26, सार्वजिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम 1984 चे कलम 4 व 5 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्‍ट कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत अनंतराव पवार यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. या घटनेत सात पोलीस जखमी झाले आहेत. चार – पाच हजार लोकांनी केलेल्या हिंसाचारात विविध शासकीय व खासगी वाहनांचे अंदाजे आठ-दहा कोटी रुपयांची वित्तहानी झाली.
शहर आणि जिल्ह्यातील कायदा आणि सुरक्षेचा प्रश्‍न असेल तर अटक आरोपीना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात येते. त्यानुसार अटक हजर करण्यात आले होते. याप्रकरणात अटक आरोपींसह चार – पाच हजार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक सरकारी वकील हेमंत मेंडकी आणि ज्ञानेश्‍वर मोरे यांनी आरोपींची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. सदर प्रकरण गंभीर असून गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. या गुन्ह्याचे कट कारस्थान कुठे रचले आहे, त्याचा सूत्रधार कोण होता आणि त्याचा उद्देश काय होता. त्यांना हत्यारे कोणी पुरवली आणि याप्रकरणी आणखी हत्यारे जप्त होऊ शकतात. त्यांनी पेट्रोल बॉटल कोठून आणले याचा तपास कारवायचा आहे. त्यांचे इतर साथीदार कोण होते याबाबत प्रत्येकाकडे वैयक्तिक चौकशी कारवयाची आहे, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. पुणे बार असोसिएशनतर्फे मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलेल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यास त्यांचे खटले मोफत लढण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.सुभाष पवार, ऍड मिलिंद पवार, ऍड एस. आर.घाटगे आणि बारमधील इतर वकिलांनी बचाव पक्षातर्फे बाजू मांडली.
.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)