चाकण ते वासुली फाटा रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

वाकी- चाकण ते वासुली फाटा या जिल्हा मार्गावरील रस्त्यावर मुसळधार पावसामुळे मोठ-मोठे खड्डे पडल्याने या मार्गावर धुळीचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाशी नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. रस्त्याच्या शेजारील लोकांना आणि प्रवास करणाऱ्यांना तोंडाला कापड बांधल्याशिवाय पर्याय राहत नाही. या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून त्वरित या रस्त्याचे नुतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चाकण ते वासुली फाटा हा रस्ता दुरुस्ती अभावी गेली अनेक वर्षे खड्ड्यात गेला आहे. याच मार्गाचा एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये जाण्यासाठी मोठा वापर केला जातो. 13 किलो मीटर लांबीच्या या मार्गाचे अनेक वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले होते. परंतु त्यानंतर मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम म्हणावे असे झाले नाही. अनेक वेळा तात्पुरत्या स्वरूपात केवळ खड्डे भरण्यात आले. सध्या या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कारखानदारी उभी राहिली असल्याने वाहनांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय त्यात अवजड वाहनांची संख्या मोठी असून त्यासाठी रस्ता अपुरा पडत आहे. अनेकदा या रस्त्याच्या नुतनीकरणाऐवजी केवळ माती आणि मुरूम टाकून दुरुस्ती केली. कालांतराने मुरूमाची देखील माती झाल्याने रस्त्यावर प्रचंड धूळ पसरत आहे. त्यामुळे खड्ड्यातून प्रवास करताना सर्वानाच मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्ते विभागाने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून रखडलेल्या या रस्त्याचे तत्काळ नुतनीकरण करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)