चाकण ते बिरदवडी रस्त्याची दयनीय अवस्था

महाळुंगे इंगळे-चाकण ते बिरदवडी या दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असल्यामुळे प्रचंड प्रमाणात उडत असणाऱ्या धुळीने नागरिकांना श्वसनासह अन्य जीवघेण्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
या भागातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे रस्ता नूतनीकरण करणे अत्यंत गरजेचे असतानाही या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. उखडलेली खडी आणि सततची उडणारी धूळ यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, असे असतानादेखील रस्ता दुरुस्ती का केली जात नाही?, याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. चाकण ते बिरदवडी या मार्गावरून प्रवास करायचे झाल्यास तोंडाला रुमाल अथवा कापड बांधल्याशिवाय किंवा हेल्मेट घातल्याशिवाय प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असल्याने लवकरात लवकर या रस्त्याचे नुतनीकरण करावे अशी मागणी येथील उद्योजक चंद्रकांत गोरे यांनी केली आहे. हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असल्याने येथे रस्त्याची वाट लागली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या रस्त्याची नावाला मलमपट्टी करण्यात आली होती; परंतु त्यानंतर मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम म्हणावे असे झाले नाही. अनेक वेळा तात्पुरत्या स्वरूपात केवळ खड्डे भरण्यात आले होते. सध्या या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कारखानदारी उभी राहिली असल्याने वाहनांचे प्रमाण सर्वाधिक झाले आहे. शिवाय त्यात अवजड वाहनांची संख्या मोठी असून, प्रवास करण्यासाठी रस्ता अपुरा पडत आहे.
रस्ते बांधकाम विभाग या रस्त्याचे नुतनीकरणाऐवजी केवळ माती आणि मुरूम टाकून रस्ता दुरुस्ती करत आहेत, असा आरोप चंदकांत गोरे यांच्यासह या भागातील नागरिकांनी केला आहे. कालांतराने मुरूमाची देखील माती झाल्याने रस्त्यावर प्रचंड धूळ पसरली आहे. त्यामुळे खड्ड्यातून मार्ग काढीत वाहन चालवावे की धुळीपासून बचाव करावा, अशा दुहेरी कात्रीत प्रवासी सापडला आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजत नसल्याने सर्वचजण मेटाकुटीला आले आहेत. विशेषतः शालेय विद्यार्थी, पायी चालणारे प्रवाशी, वृद्ध नागरिक, दुचाकी चालक आदींना या धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय रस्त्याच्या दुतर्फा राहणारे स्थानिक नागरिक यांना देखील विविध आजारांना सामोरे जावे लागत असून, नागरिकांमध्ये श्वसनाचे विविध आजार जडत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून रखडलेल्या या रस्त्याचे तत्काळ नुतनीकरण करावे, या मागणीवर या भागातील नागरिक ठाम आहेत.

  • आहेत पदाधिकारी तरीही…
    चाकण ते बिरदवडी व पुढे या रस्त्यावरच खेड तालुक्‍याचे आमदार, जिल्हा परिषदेचे एक व पंचायत समितीचे एक सदस्य, चाकणचे उपनगराध्यक्ष, चार नगरसेवक तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी राहतात. तरीही या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम का होत नाही? असा प्रश्न नागरिक विचारत असून, नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)