चाकण ग्रामीण रुग्णालयात गर्भवतीची हेळसांड

वाकी-प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयात झाल्यानंतर रुग्णांना चांगल्या सेवा मिळतील, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या चाकण येथील रुग्णांना मात्र वेठीस धरण्याचा धक्कादायक प्रकार चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात राजरोसपणे सुरू आहे. पैशांची मागणी करत भ्रष्टाचारात नखशिकांत बुडालेल्या येथील काही डॉक्‍टरांच्या भ्रष्ट कारभाराला येथील नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. विशेष बाब म्हणजे ग्रामीण रुग्णालयात एका डॉक्‍टरने अवघडलेल्या अवस्थेत असलेल्या एका गर्भवती महिलेकडे पाच हजार रुपयांची मागणी केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला असल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
चाकण येथे ग्रामीण रुग्णालय झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी आलेल्या मृत नातेवाईकांच्या कडून विच्छेदनासाठी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी ताज्या असतानाच गेल्या काही दिवसांपासून गर्भवती महिलांकडे पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या भागात असलेली एका अत्यंत गरीब कुटुंबातील अवघडलेल्या अवस्थेतील गर्भवती महिला या रुग्णालयात गेल्यानंतर या महिलेला सोनोग्राफी करण्यासाठी येथील एका खासगी दवाखान्यात पाठविण्यात आल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. या महिलेची प्रकृती अत्यंत धोकादायक व चिंताजनक असल्याचे माहिती असतानाही देखील जाणूनबुजून तिला त्रास देण्याचा प्रकार घडला. मात्र, गर्भपात करण्यासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने संबंधित महिलेकडे थेट पाच हजार रुपये मागितले. “माझी पैसे देण्याची ऐपत नाही, माझी परिस्थिती खूप हलाखीची आहे, तरी मला सहकार्य करा’, अशी आर्त विनवणी तिने संबंधित डॉकटकडे केली असता त्याने तिला उलट प्रश्न करून दवाखान्यात येते कशाला? असा उलट प्रतिप्रश्‍न केला. गर्भवती महिलेची तपासणी व तिच्यावर कसलेच उपचार न करता तिला हाकलून देण्यात आल्याने तिच्या नातेवाईकांसह येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

  • संबंधित गर्भवती महिला व तिच्या नातेवाईकांच्या आलेल्या तक्रारीनुसार या डॉक्‍टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर संबंधित डॉक्‍टरकडून नेमके काय उत्तर येते, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबत कसलीच टाळाटाळ न करता व कोणाला पाठीशी न घालता कायदेशीर व योग्य ती कारवाई केली जाणार आहे.
    – डॉ. माधव कणकवले, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय चाकण.
  • पूर्वीचे चाकण आणि आजचे अफलातून चाकण यात खूप मोठा बदल झाला आहे. चाकण प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर झाल्यानंतर चांगल्या सेवा मिळण्याची नितांत गरज आहे. मात्र तसे न होता रुग्णांची हेळसांड वाढली आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. त्यासाठी सर्वांच्या भावनांची कदर करून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने तात्काळ आर्थिक तरतुदी नुसार योग्य उपाययोजना कराव्यात.
    – जयश्री ताटे, प्रदेशाध्यक्षा भापसे पार्टी
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)