चाकणमध्ये संवेदनशील राजकारणाचा प्रत्यय

अंत्ययात्रेला वाट मिळावी म्हणून मोडली प्रचार सभा

चाकण- निवडणुकीतील मतांच्या राजकारणात सत्ताधारी असो की विरोधी त्यांच्या सामाजिक जाणीवा बोथट झाल्याचे आरोप होतात. मात्र, चाकणमध्ये महात्मा फुले चौक येथून एक अंत्ययात्रा प्रचार सभेच्या समोरून जात असताना प्रमुख वक्‍त्यांनी सभेला भाषण ऐकण्यासाठी बसलेल्या नागरिकांना सभेतून उठून वाहन जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देत निवडणुकीच्या राजकारणात एक वेगळा आदर्श घालून दिल्याचा प्रकार सोमवारी (दि. 22) पहावयास मिळाला.

सध्याच्या राजकीय वातावरणात होत असलेल्या शिरूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रमुख पक्ष जोमाने प्रचाराला लागले आहेत. दोन्हीकडून प्रचाराचा अक्षरशः धुराळा उडवला जात आहे. प्रचारात अनेक नेते मंडळींना मग ते सत्ताधारी असोत की विरोधक यांना मतांच्या राजकारणापुढे सामाजिक जाणीवेचा विसरच पडल्याचे आरोप होत असतात. एकीकडे सभेला गर्दी करण्याचे आव्हान असते. सभेला येणाऱ्या नागरिकांची खास बडदास्त ठेवली जाते. सभेला झालेली गर्दी अखेरपर्यंत टिकेल याची शाश्‍वती नसते. मात्र, अशाही वेळी सभेत प्रमुख वक्‍त्यांचे भाषण सुरू होत असतानाच आलेली अंतयात्रा पाहून चक्‍क प्रमुख वक्‍त्यांनीच सभेला आलेल्या नागरिकांना रस्त्यावरून उठवून अंत्ययात्रेच्या वाहनाला सभेतून जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत प्रचार सभेत आपले भाषण ऐकण्यासाठी आलेली गर्दी पुन्हा सभास्थळी बसेल कि नाही ? याची तमा वक्‍त्यांनी न बाळगता रस्त्यावरून उठवून बाजूला करीत दाखविलेली संवेदनशीलता चाकणमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)