चाकणकरांचे आरोग्य धोक्‍यात

चाकण- चाकण नगरपरिषदेच्या हद्दीतील नालेसफाईकडे लक्ष द्यायला नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाला वेळ नसल्याने शहरात सध्या स्वच्छतेचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून शहरातील विविध प्रभागांत नाले तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.
पावसाळ्यापूर्वी नगरपरिषदेकडून नेहमी प्रमाणे ठिकठिकाणी असलेली मोठी गटारे आणि नालेसफाईची मोहीम हाती घेते. यंदाही आरोग्य विभागातर्फे अशी मोहीम कधी सुरू झाली व संपली कधी हे कळलेच नाही. शहरातील सध्या अनेक गटारांत कचरा अडकून गटारे, नाले तुंबल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अनेक नाले आणि गटारे कचरा वा प्लॅस्टिक पिशव्यांमुळे तुंबली असून, रस्त्यावरही घाणीचे ढीग साचले आहेत. गटारांच्या स्वच्छतेकडे फारसे गांभीऱ्याने पहिले जात नसल्याने गेल्या काही दिवसांपासून गटारे, नाले कचऱ्याने तुडुंब भरलेली आहेत.गटारांत काही ठिकाणी कचरा तुंबल्याने ठिकठिकाणी पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. प्रभाग क्रमांक 20 मधील अनेक ठिकाणी असे चित्र पहावयास मिळत आहे. परिणामी डासांचे प्रमाण वाढले आहे. परिसरात ठिकठिकाणी साचणाऱ्या कचऱ्याच्या स्वच्छतेकडे नगरपरिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर नाल्याची स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते जीवन सोनवणे यांनी केली आहे. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, कचरा उचलणारा कंत्राटदार गांभीर्याने याकडे पहात नसून शहरातील कचऱ्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षासह नागरिकांतून होत आहे. चाकणमध्ये अंतर्गत रस्त्यालगत भाजीपाला विक्रेते बसत असून हे उरलेली भाजी व कचरा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी किंवा गटारांमध्ये टाकतात त्यामुळे दुर्गंधी पसरत आहेत. गटारात टाकल्या जाणाऱ्या उरलेल्या भाज्यांमुळे गटारे ठिकठीकाणी तुंबलेली आहेत. तसेच रस्त्यालगतच्या अतिक्रमांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन शाळांमध्ये जाणारी मुले व पादचाऱ्यांचा अपघात होण्याची शक्‍यता असल्यामुळे येथील अतिक्रमण करणाऱ्या मंडळींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

  • आंदोलनाचा इशारा
    चाकणमधील गटारे आणि नाल्यांच्या सफाई मोहिमेचे तीनतेरा वाजले असून, शहरातील विविध प्रभागांतील नाल्याची पूर्णपणे सफाई झालेली नाही. अनेक ठिकाणी गटारे तुंबली असून ते सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास नगरपरिषदेतील विरोधी पक्ष नेते जीवन सोनवणे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)